तस्करांच्या आवळल्या ठाणे पोलिसांनी मुसक्या

तस्करांच्या आवळल्या ठाणे पोलिसांनी मुसक्या

Published on

अमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या
ठाणे पोलिसांची धडक कारवाई, ६० कोटी ७२ लाखांचा साठा हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : एकीकडे नशामुक्तीसाठी ठाणे शहर पोलिसांकडून जोरदार जनजागृती मोहीम राबवली जात असताना, दुसरीकडे अमली पदार्थांच्या तस्करांवरही तितक्याच प्रभावी कारवाईचा बडगा उगारून वचक निर्माण करण्याचे काम पोलिसांमार्फत सुरू आहे. त्यातच २०२५ या वर्षातील नऊ महिन्यांत तब्बल २७० जणांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून ६० कोटी ७२ लाखांचा साठा हस्तगत करून नशेला वेसन घालण्याचे काम केले आहे. अटक केलेल्या तस्करांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ तस्करीविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार अमली पदार्थ साठवणूक, विक्री व खरेदी करणाऱ्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत १ जानेवारीपासून ३१ सप्टेंबर २०२५ दरम्यान कारवाई करून एकूण १८० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई ठाणे शहर पोलिस दलातील स्थानिक पोलिसांसह अमली पदार्थविरोधी पथकामार्फत करण्यात आलेली आहे. त्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात तब्बल २७० जणांना बेड्या घालूनच या तस्करीला आळा घालण्याचे काम जोरदार सुरू आहे. एकूण ६० कोटी ७२ लाखांच्या हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये ७१५ किलो गांजा, २८ किलो एमडी पावडर, सात किलो चरस आणि २० हजार कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. एवढ्यावरच पोलिस थांबले नाहीत तर अमली पदार्थ तयार करणारे कारखानेही उद्धवस्त केले आहेत. त्यातच अमली पदार्थांचा साठा हा परराज्यासह परदेशातून येत आल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नऊ महिन्यांतील कारवाईची आकडेवारी
२०२२ या वर्षात ६२ लाख
२०२३ साली एक कोटी ६१ लाख
२०२४ मध्ये एक कोटी ३९ लाख
२०२५ सप्टेंबरपर्यंत १९ कोटी ५० लाख
ठाण्यात अमली पदार्थ साठवणूक, वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी ठाणे अमली पदार्थविरोधी पथक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कार्यरत आहे. या पथकाच्या कारवाईचा आलेख गेल्या काही वर्षांतील आकडेवारी वाढलेला दिसत आहे.

कोटींचा मुद्देमाल नुकताच नष्ट
पाच वर्षांत ठाणे पोलिस आयुक्तालयात अमली पदार्थांसंदर्भात दाखल गुन्ह्यांपैकी १६३ गुन्हे
१४३ कोटी ५३ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
हेरॉईन, चरस, चरस ऑइल, हायब्रिड गांजा, कोकेन, एमडी, इफेड्रीन पावडर, ब्राउनशुगर, मेथामेफेटेमाईन, मेथेडॉन, केटामाईन, एलएसडी पेपर, मॅथेक्युलिन, एक्स्टसी पिल्स असा एकूण एक हजार ५६ किलो वजनाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
कोडीनयुक्त कफ सिरपच्या २६ हजार ९३५ बॉटल्सही नुकत्याच नष्ट करण्यात आल्या आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com