तरुण मतदारांना आकर्षित करण्याची खटाटोप

तरुण मतदारांना आकर्षित करण्याची खटाटोप

Published on

तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा खटाटोप
भाजपची नव्या अभ्‍यासक्रमाची घोषणा; काँग्रेसचा राेजगार मेळावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवमतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न प्रमुख राजकीय पक्षांकडून सुरू आहे. भाजपने पालिकेत सत्ता आल्यावर विद्यार्थ्यांसाठी एक नवीन इंटर्नशिप प्रोग्रॅम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस, दोन्ही शिवसेना आपापल्या पद्धतीने नवमतदारांना आपल्‍याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
‘इडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ या युवा संघटनेने नुकताच एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अमित साटम यांनी मतदारांशी संवाद साधला. पालिका निवडणुकीनंतर सार्वजनिक धोरण आणि प्रशासनात रस असलेल्या नवमतदार विद्यार्थ्यांसाठी एक इंटर्नशिप कार्यक्रमाची घोषणा साटम यांनी या कार्यक्रमात बोलताना केली. याअंतर्गत मुंबईच्या २४ प्रशासकीय वॉर्डमध्ये प्रत्येकी दोन जण नियुक्त केले जातील. पालिका मुख्यालयात दोघांची नियुक्ती केली जाईल. सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ५० तरुणांना महापालिका प्रशासन मजबूत करण्यासाठी संशोधन पेपर तयार करण्याची संधी मिळेल. निवडणुकीनंतर हे तरुण या कार्यक्रमांतर्गत पालिकेत सक्रियपणे काम करतील, असे आमदार अमित साटम म्हणाले.

मतदानाच्या अधिकाराबद्दल जागरूकता
आयआयटी आणि व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांचा समावेश असलेला एक अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणाही साटम यांनी केली. भाजपने युवा मतदारांशी संवाद साधण्यासोबत ‘नमो युवा वॉरिअर्स’चे स्वयंसेवक महाविद्यालयांत, युवक समूहांमध्ये आणि घराघरात जाऊन मतदानाच्या अधिकाराबद्दल जागरूकता निर्माण करीत आहेत.

प्रत्येक हाताला काम
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांनी नवमतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याअंतर्गत काँग्रेसने पहिल्यांदा टिळक भवनात रोजगार मेळावा घेतला. प्रत्येक हाताला काम देण्याची मोहीम काँग्रेसच्या स्वयंरोजगार विभागाने सुरू केली आहे.

दोन्ही शिवसेनांकडून प्रशिक्षण
दोन्ही शिवसेनांच्या स्थानिक लोकाधिकार समित्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे, रोजगार मिळवण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेनेने नवमतदारांपर्यंत पोहोचण्याची मोहीम तीव्र केली आहे.

स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम सुरू आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येत आहेत. याशिवाय विभागनिहाय विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- राजू वाघमारे, प्रवक्ते, शिवसेना

नवीन मतदार नोंदणी अभियानांतर्गत युवकांना जागरूक करण्यासोबतच आम्ही अनेक उपक्रम राबवत आहोत. मतदार नोंदणी केंद्र उभारून अधिकाधिक युवकांना तिथेच नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
- तेजिंदर सिंह तिवाना,
मुंबई अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा

नवमतदारांना आपल्यासोबत जोडून घेण्यासाठी शिवसेनेची युवासेना वर्षभर विविध कार्यक्रम राबवीत असते. आदित्य ठाकरे यांचे अभ्यासू नेतृत्व, कामाची शैली ही कायम युवकांना आकर्षित करीत आली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत नवमतदार आमच्या पाठीशी उभा राहील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
- हर्षल प्रधान, प्रवक्ता, शिवसेना ठाकरे गट

नवमतदारांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागरूक करण्यासाठी वार्डनिहाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्याचे आमचे नियोजन आहे. यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणार आहोत.
- झीनत शबरीन, अध्यक्ष, मुंबई युवक काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com