खड्डे भरण्यासाठी महापालिकेची नाईट-शिफ्ट

खड्डे भरण्यासाठी महापालिकेची नाईट-शिफ्ट

Published on

खड्डे भरण्यासाठी महापालिकेची रात्रपाळी
आयुक्तांचे ‘मिशन’ खड्डेमुक्त उल्हासनगर; पक्षांमध्ये श्रेयवाद
दिनेश गोगी ः सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ८ ः पावसाळ्यात ‘खड्ड्यांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरमधील खड्डेमय रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी, तसेच पावसाळ्यानंतर रस्ते सुसाट करण्यासाठी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी कंबर कसली आहे. त्यांनी आठवड्यापूर्वीच शहरातील १० मुख्य रस्ते आणि चौकांची पाहणी करून खड्डे तत्काळ भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पावसाने विश्रांती घेताच सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी (ता. ७) पासून ‘रात्रपाळी’ सुरू करून युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे.

रात्रीच्या वेळी खड्डे भरण्याचे काम सुरू असताना आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनीही ऑन-फिल्ड उतरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले; मात्र या कामांमुळे शहरात श्रेयवादाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे आणि मैनुद्दीन शेख यांनी वारंवार केलेल्या आंदोलनामुळे आणि दिलेल्या इशाऱ्यामुळेच हे खड्डे भरण्याचे काम सुरू झाल्याचा दावा केल्याने श्रेयवादाची चर्चा सुरू झाली आहे.

आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी ज्या दहा मुख्य ठिकाणी पाहणी केली होती, त्यात धोबी घाट रोड, कल्याण-मुरबाड रोड, खेमाणी भाजीमार्केट चौक, खेमाणी चौक व नानिक जिरा चौक, मध्यवर्ती पोलिस ठाणे ते मयूर हॉटेल रस्ता, फॉलवर लाइन चौक (कल्याण-बदलापूर रोड), छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल, लालचक्की ते उल्हासनगर रेल्वेस्थानक रोड, व्हीनस चौक व नेताजी चौक यांचा समावेश होता. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राधान्याने खड्डे भरून घेण्याचे, विकासकामे आणि खड्डे भरण्याची कामे जलद गतीने करण्याचे, तसेच जलवाहिनीचे लिकेज तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते.

मास्टिक डांबराचा वापर
आयुक्तांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू झाले आहे. खड्डे भरण्यासाठी मास्टिक डांबराचा वापर केला जात आहे. हे डांबर २०० अंश सेल्सिअस तापमानात उकळवून खड्ड्यात टाकले जाते, ज्यामुळे ते केवळ दोन तासांत खड्डे घट्ट पकड घेतात. यामुळेच, आता दररोज नाईट-शिफ्टमध्ये खड्डे भरण्याचे काम सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com