कचरा ठेकेदारांमुळे प्रदूषणात वाढ
कचरा ठेकेदारांमुळे प्रदूषणात वाढ
भिवंडीत कचरा संकलनासाठी जीर्ण, विनाक्रमांक भंगार वाहनांचा वापर
भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी महापालिका दरमहा शहर स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाही, कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे भिवंडीतील प्रदूषणात वाढ झाली आहे. अत्यंत जीर्ण आणि भंगार झालेल्या वाहनांचा वापर तसेच या वाहनांना क्रमांक नसणे या गंभीर गैरप्रकारांमुळे शहरातील स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा वाजले आहेत. कचरा ठेकेदार केवळ आर्थिक लालसेपोटी अत्यंत जुन्या, जीर्ण झालेल्या आणि अनेकदा फाटलेले सायलेन्सर असलेल्या वाहनांद्वारे कचरा वाहतूक करत आहेत. या वाहनांमधून कचरा रस्त्यावर पडत असल्याने दुर्गंधी पसरते.
फाटलेल्या सायलेन्सरमधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड वायू उत्सर्जित होत असल्याने शहरातील प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. जीर्ण वाहनांचे अचानक ब्रेक फेल होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणाहून कचरा उचलला जातो, तेथे जंतुनाशके फवारली जात नाहीत. त्यामुळे कायम दुर्गंधी पसरलेली असते. रोज शहरातून सुमारे ४०० ते ४५० टन सुका व ओला कचरा वाहतूक केला जातो. यासाठी पालिका दरमहा सुमारे तीन कोटी रुपये खर्च करते; मात्र ठेकेदार वाहतूक नियमांचे उल्लंघन करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत.
शहरातील नागरिकांकडून असा आरोप केला जात आहे की, कचरा ठेकेदारीमध्ये राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या गैरप्रकारांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर अंभोरे यांनी याबाबत महापालिका आयुक्त अनमोल सागर आणि उपायुक्त (आरोग्य) विक्रम दराडे यांच्याकडे निवेदन दिले आहे. निविदेतील नियम व कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, तसेच जीर्ण आणि क्रमांक नसलेली वाहने तत्काळ हटवण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना सूचना द्याव्यात, अशी मागणी अंभोरे यांनी केली आहे.
कारवाईचे संकेत
महापालिका हद्दीतील कचरा ठेकेदार वाहनांद्वारे वाहून नेत चावींद्रा येथील पालिकेच्या आरक्षित जागेवर टाकून जमा करते. यासाठी प्रशासनाने महानगरपालिका विभाग एक ते पाच मध्ये कचरा उचलण्यासाठी कंत्राटदारांना करारबद्ध केले आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील निवासी सोसायट्या, दुकाने, हॉटेल्स आणि पॉवरलूम उद्योगांमधून दरवर्षी ४०० टनांहून अधिक सुका आणि ओला कचरा निर्माण होतो. कंत्राटदार हा कचरा ट्रक आणि गाड्यांमध्ये भरतात आणि रामनगर चाविद्रा डंपिंग ग्राउंडवर टाकतात. या सर्व तक्रारी आणि नियमांचे उल्लंघन वाढल्याने प्रशासनाने आता कारवाई सुरू केली आहे.
शहरातील नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदार आणि वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच कामात आणि वाहनांबाबत हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
- जयवंत सोनावणे, स्वच्छता व आरोग्य अधिकारी, भिवंडी महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.