थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

ई- पिक पाहणीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
तळा, ता. ८ (बातमीदार) : राज्यातील शेतकरी बांधवांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ई- पिक पाहणी प्रक्रियेसाठी शासनाने मुदतवाढ जाहीर केली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी ई- पिक पाहणीसाठीची अंतिम तारीख वाढवून १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ अशी केली असून, सर्व शेतकऱ्यांनी सहाय्यकांच्या मदतीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन ई पिक पाहणी पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत.
ई पिक पाहणी ही नव्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या पिकांची डिजिटल नोंदणी करण्याची प्रक्रिया असून, सातबाऱ्यावर अचूक माहिती दिसावी यासाठी ती आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती मोबाइल ॲपद्वारे भरल्यानंतर महसूल अधिकारी ४८ तासांत ती तपासून पोर्टलवर मंजूर करतात. मंजुरीनंतर ही माहिती थेट शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर दिसते. यामुळे शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास सुलभता मिळते. तरीही काही भागात तांत्रिक अडचणी, नेटवर्क समस्या आणि अपूर्ण नोंदीमुळे अनेक शेतकऱ्यांची पाहणी अपूर्ण राहिली होती. या पार्श्वभूमीवरच शासनाने मुदतवाढ देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सर्व तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि महसूल सहाय्यकांना प्रत्येक शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी बांधवांनी या मुदतीत ई पिक पाहणी पूर्ण करून कृषी योजनांच्या लाभासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.
.............
कोलाड लायन्स क्लबच्या सेवा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम उत्साहात
रोहा (बातमीदार) : लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने कोलाड लायन्स क्लबने १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा भव्य उपक्रम आठवडा उत्साहात साजरा केला. जिल्हा प्रमुख पदाधिकारी गिरीश म्हात्रे व सूक्ष्मिता शिट्यालकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्ष रविंद्र लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला. या आठवड्यात नेत्र तपासणी शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह आणि रक्तदाब तपासणी, तसेच महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. गरजूंसाठी अन्नधान्य, कपडे, ब्लँकेट, तसेच शालेय विद्यार्थ्यांना मराठी–इंग्रजी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महिलांसाठी ‘नवरात्र फनी गेम – पैठणी स्पर्धा’ उत्साहात पार पडली. क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर सानप, माजी अध्यक्ष नरेश बिरगावले, डॉ. मंगेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव अलंकार खांडेकर, खजिनदार गजानन बामणे, उपाध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे आदींनी विशेष मेहनत घेतली. वृद्धाश्रमात फळवाटप तसेच कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह आदी आजारांवरील जनजागृती कार्यक्रम घेऊन आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. या सेवा सप्ताहामुळे कोलाड परिसरात लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याला नवा आयाम मिळाला आहे.
.................
भाऊसाहेब नेने महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा
पेण (बातमीदार) : भाऊसाहेब नेने महाविद्यालयात हिंदी विभाग, हिंदी अनुवाद प्रमाणपत्र कोर्स आणि डीएलएलई युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र, पेण शाखेचे प्रबंधक नितेश विश्वकर्मा यांनी बँकिंग क्षेत्रात हिंदी भाषेचे महत्त्व, या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्‌घाटन दीपप्रज्वलनाने झाले. प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी हिंदी ही केवळ भाषा नसून भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे, असे सांगत विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. देविदास बामणे ‘संघर्ष’ यांनी हिंदी मेरी पहचान, ही स्वरचित कविता सादर करून कार्यक्रमाचे सौंदर्य वाढविले. तसेच ‘दर्पण’ भित्तिपत्रिकेचे अनावरणही याच प्रसंगी झाले. काव्यवाचन आणि शेर-ओ-शायरी स्पर्धेत गुंजने कुमारी ठाकूर (प्रथम), शिखा यादव (द्वितीय) व हर्षल पाटील (तृतीय) विजेते ठरले. प्राध्यापक हिमांग टोंगारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देविदास बामणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सुषमा खोत यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये हिंदीबद्दल नवीन उत्साह निर्माण झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
............
माणगावमध्ये ‘श्रीमती गीता तटकरे नर्सिंग कॉलेज’चा भव्य शुभारंभ
माणगाव (वार्ताहर) : माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेजचा शुभारंभ सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी मोठ्या दिमाखात झाला. नवीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित ओरिएंटेशन व दीक्षारंभ कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सचिव कृष्णा गांधी, चेअरमन डॉ. गौतम राऊत, तसेच प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर, डॉ. आबासाहेब पाटणकर, डॉ. हेमंत गांधी, अरुण पवार, अंकिता साबळे, निशिगंधा मायेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाचे शैक्षणिक व व्यावसायिक महत्त्व स्पष्ट करून दिले. नर्सिंग ही मानवतेची खरी सेवा आहे. देशातच नव्हे तर परदेशातही या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत, असे वक्त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना स्वागतचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या भव्य प्रारंभी कार्यक्रमामुळे माणगाव तालुक्यात नर्सिंग शिक्षणाच्या नव्या पर्वाला प्रारंभ झाला आहे.
................
तळे येथे शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
माणगाव (वार्ताहर) : तळे येथे विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. पेणजाई मंदिर प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष परेश सांगळे, माजी तालुकाध्यक्ष संजय (आप्पा) ढवळे, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोरे यांनी देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा वेग वाढy1;k आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, असे सांगितले. या कार्यक्रमात देवजी माने, कृष्णा मोंडे, सिताराम पोटले, गणेश वडेकर, रिना माने, आशा पोटले, प्रतीक्षा मांडवकर आदी महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. माणगाव तालुक्यातील हा जंबो प्रवेश भाजपच्या संघटनात्मक बळवृद्धीचा टप्पा ठरत आहे.
.......................
कृषी समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
मुरूड (बातमीदार) : कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त विविध यंत्रसामग्रीवर अनुदान उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर फार्मर आयडीद्वारे लॉगिन करून अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या योजनेत पावर टिलर, ट्रॅक्टर, भात लावणी, कापणी, मळणी यंत्रे, ब्रश कटर, फवारणी पंप, पाण्याचे पंप आदींसाठी अनुदान दिले जाते. त्याचबरोबर महाविस्तार एआय ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक पद्धती, कीड–रोग नियंत्रण, खत व्यवस्थापन, हवामान, बाजारभाव आदींची माहिती मिळते. कृषी अधिकारी प्रज्ञा भोईटे यांनी सांगितले की, प्रत्येक शेतकऱ्याने या ॲपचा वापर करून आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी. गावपातळीवर सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यामार्फत या योजनेची माहिती व प्रचारप्रसार केला जात आहे.
मुरूड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी समृद्धी योजना आणि महाविस्तार एआय ॲपचा लाभ घेत शेती उत्पादनवाढ व उत्पन्नवाढ साध्य करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com