खोपोलीत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची गर्दी
खोपोलीत नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची गर्दी
मुख्य लढत डॉ. सुनील पाटील आणि कुलदीपक शेंडे यांच्यात होण्याची शक्यता
खोपोली, ता. ८ (बातमीदार) : राज्यातील पात्र नगरपालिका व नगर पंचायतींसाठी सोमवारी नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले असून, खोपोली नगरपालिकेसाठी सर्वसाधारण आरक्षण घोषित झाले आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली असून, इच्छुकांची रांग वाढली आहे. विविध पक्षांनी आपल्या गोटात सर्वमान्य आणि प्रभावी उमेदवार निवडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
शिवसेना (शिंदे गट) आणि स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या गटातून माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांना हिरवा कंदील मिळाल्याचे सांगितले जात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, खासदार सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पाठबळामुळे त्यांचा दावा मजबूत मानला जातो.
सर्वसाधारण श्रेणी खुली राहिल्यामुळे आघाडी किंवा युतीची शक्यता कमी असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस, शेकाप, आप आणि इतर स्थानिक संघटनांकडूनही उमेदवार निश्चित करण्याची चुरस सुरू आहे. भाजपकडून यशवंत साबळे किंवा विक्रम साबळे या नावांचा उल्लेख होत असून, काँग्रेसकडून उल्हासराव देशमुख, तर शेकापकडून किशोर पाटील यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, खोपोली संघर्ष समितीकडून पक्षनिरपेक्ष सर्वसामान्य उमेदवार देण्याचीही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. तरीदेखील स्थानिक राजकीय समीकरणे, नेतृत्वाचे वजन आणि पक्षीय ताकद पाहता खोपोली नगराध्यक्षपदाची मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सुनील पाटील आणि शिवसेना (शिंदे गट)चे कुलदीपक शेंडे यांच्यातच रंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, दोन्ही गटांकडून प्रचार योजना, कार्यकर्त्यांची बैठक आणि रणनीती ठरवण्याची हालचाल सुरू आहे. खोपोलीतील ही निवडणूक केवळ नगराध्यक्षपदापुरती मर्यादित न राहता, ती थोरवे विरुद्ध तटकरे गट अशा राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईचे स्वरूप घेईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.