अलिबाग नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर
अलिबाग नगर परिषदेची आरक्षण सोडत जाहीर
सदस्यसंख्या १७ वरून २०वर; १० जागांवर महिलांना संधी
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर) ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर बुधवारी (ता. ८) अलिबाग नगर परिषदेच्या सदस्यपदाची सोडत जाहीर करण्यात आली. अलिबाग नगर परिषदेचे यापूर्वी आठ प्रभाग असून, १७ सदस्यसंख्या होती. ते प्रभाग वाढवून १० करण्यात आले आहेत, तर सदस्यसंख्या २० करण्यात आली आहे. अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, पीठासीन अधिकारी म्हणून सागर साळुंखे आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. प्रशासनाने वेगाने तयारीदेखील सुरू केली आहे. सोमवारी मंत्रालयात नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यात अलिबाग नगर परिषदेचे अध्यक्षपद खुला महिला प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे स्वप्न भंगले आहे. मंगळवारी सदस्यपदाची सोडत जाहीर करण्यात आली. १० प्रभागांमध्ये २० सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये ५० टक्के महिलांना आरक्षण असून, अनुसूचित जमातीसाठी तीन आणि अनुसूचित जातीसाठी एक अशा जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
प्रत्येक प्रभागामध्ये दोन सदस्य असणार आहेत. प्रभाग एकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग दोन मध्ये अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग तीनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग चारमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग पाचमध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग सहामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग सातमध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग आठमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग नऊमध्ये अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण, तर प्रभाग १० मध्ये अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिला, असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
.................
अलिबाग नगर परिषद क्षेत्राची लोकसंख्या ही २० हजार ७४३ एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ११८२ इतकी असून, अनुसूचित जमातींची लोकसंख्या २७३५ इतकी आहे. अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने सर्वांचे लक्ष तिकडे आहे. या पूर्वीच्या निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी यांनी युती होती; मात्र राष्ट्रवादीला नगर परिषदेत एकही जागा मिळाली नव्हती. शेकापची एकहाती सत्ता आली होती. या वेळी शिवसेना आपला उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभा करणार असल्याने चुरस बघायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.