शेतकऱ्यांना सर्व कर्जातून मुक्ती द्यावी

शेतकऱ्यांना सर्व कर्जातून मुक्ती द्यावी

Published on

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : पीकविम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी, तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी करत भिवंडी शहर शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आंदोलन करून प्रांताधिकारी अमित सानप यांना निवेदन दिले.
विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विद्यमान व पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते; परंतु जवळपास एक वर्ष उलटूनही यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच उत्पादन खर्चातील वाढलेल्या महागड्या खत व औषधांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे भाव हमीभावापेक्षा कमी मिळत असल्याने उत्पादन खर्च वसूल करणे कठीण झाले आहे. शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव व योग्य बाजार नसल्यामुळे बरेच शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. अनेकांना थकबाकीमुळे नोटिसा, जप्ती कार्यवाही किंवा काहींना आत्महत्येच्या टोकाच्या निर्णयाकडे ढकलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती ही तातडीची आणि परिणामकारक उपाययोजना असल्याचे आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितले. याप्रसंगी भिवंडी शहर जिल्हाप्रमुख मनोज गगे, शहरप्रमुख प्रसाद पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका वैशाली मेस्त्री, तसेच विश्वास थळे, कुंदन पाटील, अरुण पाटील, राजा पुण्यार्थी, नीलेश दांडेकर, करसन ठाकरे, शांताराम गायकवाड यांसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सर्व प्रकारच्या कर्जासाठी मागणी
ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर, थकबाकीदार व चालू बाकीदारांसहित, अल्प-मुदतीचे पीक कर्ज, मध्यम-मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलीहाऊस व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले; तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ट केली जावी, अशी मागणी लिखित निवेदनात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com