दबावामुळे पाकिस्तानवर हल्ला
करण्यापासून लष्कराला राेखले

दबावामुळे पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून लष्कराला राेखले

Published on

दबावामुळे पाकिस्तानवर हल्ला
करण्यापासून लष्कराला राेखले

पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका; नवी मुंबई विमानतळाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी लाट होती. देशाचे सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी करीत हाेते; मात्र आंतरराष्‍ट्रीय दबावामुळे काँग्रेसने पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून सैन्याला रोखले. काॅँग्रेसचा दहशतवादासमाेर दुबळेपणाच यातून सिद्ध हाेताे. यामुळेच देशाला अनेक वेळा किंमत माेजावी लागली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर केली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज (ता. ८) मोदींच्या हस्ते उलवे येथे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी मोदी यांनी देशाचा विकास, काँग्रेस आणि प्रकल्पात अडथळे आणणाऱ्या विरोधकांवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबई हल्ल्याबाबत भाष्य केले होते. तो आधार घेऊन मोदी यांनी आज त्यांच्या भाषणात काँग्रेसला त्यावरून प्रश्न विचारला. ‘मुंबईवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला न करण्यासाठी काँग्रेसवर दबाव टाकणारा कोणता देश आणि तो कोणता नेता होता, हे भारतीय नागरिकांना जाणून घेण्याचा अधिकार आहे. हा नाकर्तेपणा म्हणजे मुंबईसह भारतीयांच्या भावनांशी खेळ आहे,’ असा टोलाही मोदी यांनी लगावला. ‘काँग्रेसच्या दुबळेपणामुळे दहशतवाद्यांना बळ मिळून देशाची सुरक्षा कमकुवत होत गेली. त्याची देशाला अनेक हल्ल्यांतून किंमत मोजावी लागली,’ असा आराेप त्यांनी केला.
‘आमच्या सरकारसाठी देश आणि देशवासीयांची सुरक्षा यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीच नाही. आजचा भारत दमदार झाला असून, तो घरात घुसून मारतो. हे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने जगाने पाहिले. याचा आम्हाला गर्व आहे,’ असे मोदी या वेळी म्हणाले.

ही विकसित भारताची झलक!
नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईत आता दुसरे स्वतःचे आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्याने आशिया खंडात जगातील सर्वात मोठे एव्‍हिएशन हब तयार होत असल्याचा दावा मोदी यांनी केला. या विमानतळामध्ये विकसित भारताची झलक दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत हे विमानतळ तयार झाले आहे. त्याचा आकार ‘कमळा’सारखा असल्यामुळे हे संस्कृती आणि समृद्धीचे जिवंत प्रतीक असल्याचे मोदी यांनी कौतुक केले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानाची प्रतिकृती भेट देऊन पंतप्रधान माेदी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी मोदी यांचे स्वागत केले.

मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी आहे; मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे देशाचे ‘एव्हिएशन कॅपिटल’ म्हणून उदयास येणार आहे, असा विश्वास केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला. २०१४ला मुंबईत १९० आंतरराष्ट्रीय विमाने येत होती. आता त्यांची संख्या २६०वर गेली आहे, अशी माहिती देऊन नायडू यांनी मराठीत भाषणाची सांगता केली. याप्रसंगी विमानतळाच्या उद्‌घाटनासह मुंबई मेट्रो लाइन ३चे लोकार्पण मोदी यांनी केले. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) तयार करण्यात आलेले ‘मुंबई वन’ या ॲपचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी मंचावर राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची भाषणे झाली. खासदार सुनील तटकरे, वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, महेश बालदी आदी मान्यवर उपस्थित होते.
----------------------------------------
हवाई चप्पल घालणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण!
२०२४ला मला देशाने पुन्हा संधी दिली होती, तेव्हा एक दिवस हवाई चप्पल घालणारा हवाई सफर करेल, असे स्वप्न मी पाहिले होते. हे स्वप्न मोठ्या गांभीर्याने पूर्णत्वास आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असून, त्याअंतर्गत देशभरात ९०पेक्षा जास्त विमानतळे उभारून दाखवली आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच उड्डाण योजनेमुळे १० लाखांपेक्षा अधिक लोकांना स्वस्तात हवाई सफर करता आल्याचे मोदी यांनी सांगितले.
----------------------------------------
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राला साकडे
राज्याच्या विकासकामांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी पाठिंबा दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामात आलेल्या अनंत अडचणी दूर झाल्या, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात केली. याप्रसंगी पवार यांनी त्यांच्या भाषणाची सांगता शेराेशायरीने केली. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव पाठवल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
-------------------------------------------
हे विमानतळ हिथ्राेची
बराेबरी करेल : शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ला जे उड्डाण केले, ते देशाच्या विकासासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. १० वर्षांत १५०पेक्षा अधिक विमानतळे मोदी यांच्यामुळे उभारता आली. आता आगामी काळात ३००पर्यंत विमानतळे निर्माण करायची आहेत, असा संकल्प शिंदे यांनी केला. तसेच सध्या लंडनमधील हिथ्रोची तुलना नवी मुंबई विमानतळासोबत केली जात आहे; पण काही वर्षांनी नवी मुंबई विमानतळ हिथ्रो विमानतळाची बरोबरी करेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. ३२ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांसाठी तरतूद केली असून, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने महाराष्ट्राला दोन लाख कोटी दिले; पण मोदी यांनी १० वर्षांत १० लाख कोटी दिले, असे सांगत आगामी निवडणुकांत महायुतीचा विजय होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
-----
मुंबईकरांना सुविधेपासून वंचित ठेवणे हे मोठे पाप!
मेट्रो मार्ग क्रमांक-३ या भुयारी मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. यानिमित्ताने मोदी यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर टीका केली. या कामाचे मी जेव्हा भूमिपूजन केले तेव्हा मुंबईच्या लोकांच्या मनात आशा निर्माण झाली होती. काही वर्षांसाठी सत्तेत आलेल्या नेत्यांनी हा प्रकल्प रोखला. आता या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर ज्या ठिकाणी अडीच तास लागत होते त्याच ठिकाणी भुयारी मेट्रोमुळे अवघ्या ३० मिनिटांत जाता येणार आहे. मुंबईत मिनिटांना एवढी किंमत असताना एवढी वर्षे या सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम म्हणजे मोठे पाप आहे, अशी टीका मोदी यांनी नाव न घेता ठाकरे गटावर केली.
-----
‘दिबां’च्या नावाची घाेषणा नाहीच!
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्यांच्या भाषणात लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा करतील, असे नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील प्रकल्पग्रस्तांना वाटत होते. मोदी यांनी भाषणात ‘दिबां’च्या समाजसेवेचा गौरव करीत त्यांचे स्मरण केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या भाषणात सुरुवातीला ‘दिबां’च्या नावाचा उल्लेख केला; मात्र कार्यक्रम संपल्यानंतरही नावाची घोषणा न केल्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्तांचा हिरमोड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com