आरोपींच्या निर्दोषत्वाला आव्हान देणार नाही
आरोपींच्या निर्दोषत्वाला आव्हान देणार नाही
सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी ‘सीबीआय’ची उच्च न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : कुख्यात गुंड सोहराबुद्दीन शेख याच्या गुजरात पोलिसांनी २००५मध्ये केलेल्या कथित बनावट चकमकीशी संबंधित खटल्यातील आरोपींच्या निर्दोषत्वाला आव्हान देणार नसल्याची भूमिका ‘सीबीआय’ने बुधवारी (ता. ८) उच्च न्यायालयात मांडली. निकालाच्या सात वर्षांनंतर सीबीआयने याबाबत आपली भूमिका मांडली. या चकमकीतील सर्व २२ आरोपींची निर्दोष सुटका करण्याचा निर्णय सीबीआयने स्वीकारला आहे आणि २०१८मध्ये विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध अपील दाखल करणार नाही, असेही न्यायालयात सांगितले.
ही चकमक नसून सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्यांचा सहकारी तुलसीराम प्रजापती यांच्या हत्येचा कट रचण्यात आरोपींचा सहभाग होता, याबाबत ठोस पुरावे सादर करण्यास सरकारी वकिलांना अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवून डिसेंबर २०१८मध्ये विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाला शेखचा भाऊ रुबाबुद्दीन आणि नयाबुद्दीन शेख यांनी एप्रिल २०१९मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच काही साक्षीदारांना पुन्हा साक्षीसाठी पाचारण करण्याची मागणी केली होती.
मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआय कोणतेही अपील करणार नाही, सीबीआयने विशेष न्यायालयाचा निर्णय स्वीकारला आहे, असेही सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी खंडपीठाला सांगितले. या प्रकरणात एकूण २१० साक्षीदार असून त्यापैकी ९२ साक्षीदार फितूर झाले आहेत. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेचे योग्यरीत्या पालन झाले नसल्याचा दावाही अपीलकर्त्यांकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन अपीलकर्त्यांनुसार ज्या साक्षीदारांचे जबाब अचूकपणे नोंदवले गेले नाहीत त्याबाबतचा तक्ता न्यायालयात सादर करण्याचे आदेश देऊन खंडपीठाने पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी ठेवली.
प्रकरण काय?
सोहराबुद्दीन याच्यासह त्याची पत्नी कौसरबी आणि मित्र तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीप्रकरणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने २२ आरोपींची निर्दोष सुटका केली. आवश्यक त्या मंजुरीविना आरोपींवर खटला चालवला जाऊ शकत नाही आणि बहुतांश साक्षीदार फितूर झाल्याचा निर्वाळा देऊन विशेष न्यायालयाने आरोपींची निर्दोष सुटका केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.