कल्याण-बदलापूर महामार्गाच्या कामाला गती

कल्याण-बदलापूर महामार्गाच्या कामाला गती

Published on

कल्याण-बदलापूर महामार्गाच्या कामाला गती
नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : उल्हासनगर शहराला भेडसावणाऱ्या खड्डेमय रस्ते, पाण्याची गळती आणि झोपडपट्ट्यांमधील शौचालयांची दुरवस्था या गंभीर समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उल्हासनगर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ‘‘शहर बदलायचे असेल, तर धाडसी निर्णय घ्यावेच लागतील,’’ असा स्पष्ट इशारा आमदारांनी या वेळी दिला.

राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रशांत मानकर यांनी माहिती दिली की, उल्हासनगर हद्दीतील कल्याण-बदलापूर रस्त्यांचे काम पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार आयलानी यांनी निर्देश दिले की, रस्ते विकासासाठीच्या टेंडरमध्ये पेव्हर ब्लॉक, काँक्रीट आणि डांबरी रस्त्यांचे एकत्रित नियोजन असावे. त्यांनी ‘तात्पुरते उपाय नकोत, टिकाऊ आणि दर्जेदार काम हवे’ असे स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान आमदार आणि माजी नगरसेवकांनी महापालिकेचे शहर अभियंता नीलेश शिरसाटे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तोंडी आश्वासने देऊन प्रत्यक्ष कामात गती न आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. आमदार आयलानी यांनी अधिकाऱ्यांवर कठोर ताशेरे ओढत सांगितले की, “केबिनमध्ये बसून शहर चालत नाही! नागरिकांचे हाल बघा. दिवाळीपूर्वी उल्हासनगरातील सर्व रस्ते व्यवस्थित व चालण्यायोग्य अवस्थेत असले पाहिजेत, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम त्यांनी भरला. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचे बिल ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिले.

पाणीगळती आणि शौचालयांवर विशेष लक्ष
रस्त्यांच्या कामापूर्वी पाणीपुरवठा विभाग आणि पीडब्ल्यूडी यांनी संयुक्त दौरा करून सर्वात अगोदर पाइपलाइनची गळती बंद करावी, त्यानंतरच रस्त्यांचे काम सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश आमदारांनी दिले. याशिवाय शहरातील स्लम भागांतील शौचालयांची चिंताजनक अवस्था लक्षात घेऊन, ज्या शौचालयांची दुरुस्ती झाली आहे किंवा दरवाजे बसवले आहेत, त्या सर्व ठिकाणांची लोकेशन आणि फोटोसह माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com