कल्याण अवती-भवती
दिवाळीच्या स्वागतासाठी नृत्यरूपी संध्या
डोंबिवली : श्रीकला संस्कार न्यासने दिवाळी सणाच्या स्वागतासाठी एका आगळ्यावेगळ्या नृत्यसंध्येचे आयोजन केले आहे. ‘समईच्या शुभ्र कळ्या’ ही नृत्यरूपी दिवाळी संध्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतबद्ध केलेल्या अमर रचनांवर आधारित असणार आहे. हा विशेष कार्यक्रम शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता माउली हॉल, पेंढारकर कॉलेजजवळ, डोंबिवली (पूर्व) येथे रंगणार आहे. या कार्यक्रमात डोंबिवलीतील १० नामांकित नृत्यसंस्था सहभागी होणार आहेत. या नृत्यसंस्थांच्या माध्यमातून पारंपरिक आणि आधुनिक नृत्यशैलींचा सुंदर संगम साधत हृदयनाथांच्या सुरेल काव्याला नृत्यरूप दिले जाईल. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक मयूरेश साने करणार आहेत. डोंबिवलीतील कलाप्रेमींसाठी ही नृत्यरूपी संध्या दिवाळीचा उत्साह द्विगुणित करणारी ठरेल.
.............................
पूरग्रस्तांसाठी डोंबिवलीतील गणेश मंदिरातर्फे मदतीचे आवाहन
डोंबिवली : राज्याच्या विविध भागांत आलेल्या भीषण पूरस्थितीने शेती आणि लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. या संकटात सापडलेल्या पूरग्रस्त भागातील नागरिकांना आर्थिक आणि वस्तुरूपाने मदत करण्यासाठी डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने पुढाकार घेतला आहे. मंदिर संस्थानतर्फे शहर परिसरातील नागरिकांना या ‘आपत्कालीन निवारण निधी’साठी आर्थिक किंवा वस्तुरूपाने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संकलित झालेला हा निधी योग्य नियोजन करून राज्याच्या विविध भागातील पूरग्रस्तांना वाटप केला जाईल. नागरिकांनी आपले मदतीचे धनादेश ‘श्री गणेश मंदिर संस्थान’ नावाने काढायचे आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी गणेश मंदिर संस्थान, प्र. के. अत्रे वाचनालय, गणेश वैद्यकीय सुविधा केंद्र आणि श्री मारुती मंदिर येथे मार्गदर्शन आणि संकलनासाठी कक्ष उभारण्यात आले आहेत. गणेश मंदिरात सकाळी ८ ते दुपारी १:३० आणि दुपारी तीन ते रात्री ८ या वेळेत निधी संकलन केले जाईल. नागरिकांनी या मानवतावादी उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानने केले आहे.
...............................
महाराष्ट्र गतका संघ दिल्लीसाठी रवाना
कल्याण (वार्ताहर) : गतका फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सब-ज्युनियर आणि ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा ६४ खेळाडूंचा संघ दिल्लीसाठी रवाना झाला आहे. ही स्पर्धा १० ते १२ ऑक्टोबर या कालावधीत दिल्ली येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्रातून तब्बल ६४ खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये ३७ मुली आणि २७ मुलांचा समावेश आहे. हा संपूर्ण संघ ८ ऑक्टोबर रोजी दिल्लीकरिता रवाना झाला. संघ व्यवस्थापक म्हणून स्मित चौधरी आणि मानसी पवार, तर प्रशिक्षक म्हणून अथर्व नलावडे, धीरज कोट, श्रीधर कमले, कोमल शिंदे हे काम पाहणार आहेत. मीडिया इन्चार्जची जबाबदारी रोहन पवार यांच्याकडे आहे. असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष अश्विनी महांगडे, सचिव प्रा. आरती चौधरी, खजिनदार ॲड. सायली जाधव आणि सर्व जिल्हा प्रतिनिधींनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.