‘पाताळगंगा’चे पावित्र्य संकटात
‘पाताळगंगा’चे पावित्र्य संकटात
मांगुर तलावांतील घाण नदीपात्रात, रोगराईची भीती
खालापूर, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यातील महड, धामणी, पौध, कोपरी, मोहपाडा भागात मांगुर माशांचे बेकायदा पालन केले जाते. या तलावातील घाण नदीपात्रात सोडली जात असल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. तर पेयजल योजनांमुळे अनेक गावांमध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
खालापूर तालुक्यात खोपोलीतून वाहणारी पातळगंगा नदी आपटा गावाजवळ खाडीला मिळते. मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषणाचा त्रास असताना त्यात मांगुर तलावाची भर पडली आहे. मांगुर मासे हे मानवी जीवितास धोकादायक असल्याने रोगराई वाढण्याची शक्यता आहे. मांगुर माशांना कोंबड्यांचा टाकावू भाग खाद्य म्हणून टाकला जातो. त्यामुळे तलावापासून एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याच तलावातील दुर्गंधीयुक्त पाणी ठरावीक काळानंतर नदीत सोडले जाते. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पाणी पातळी कमी असल्याने दुर्गंधी जाणवत आहे.
-----------------------------------------
पाण्याला दुर्गंधी
सावरोली पूल, धामणी परिसरात पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. गुरेदेखील पाण्याला तोंड लावत नसून अनेक गावांत नदीचे पाणी पिण्यासाठी तसेच दैनंदिन गरजेसाठी वापरले जात असल्याने साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड आणि मत्स्य विभाग रायगड यांच्याकडून कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
---------------------------------
मांगुर मत्स्यपालन कारवाईत सातत्य नाही. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. कठोर कारवाई झाली नाही तर अलिबाग येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल.
- सुरेश गावडे, माहिती अधिकार कार्यकर्ता