थोडक्यात बातम्या रायगड
मजगाव आयटीआय संस्थांमध्ये अल्पमुदती अभ्यासक्रमांचा शुभारंभ
मुरूड (वार्ताहर) ः देशभरातील सर्व आयटीआय संस्थांमध्ये एकाच वेळी अल्पमुदती अभ्यासक्रमांचा उद्घाटन सोहळा ८ ऑक्टोबरला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य भारत – सक्षम भारत, या संकल्पनेचे महत्त्व सांगितले. मुरूड येथील वीर कोंडाजी फर्जंट आयटीआय व मेहरुन्निस्सा अब्बास फक्की हॉल येथे हे कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. प्रमुख अतिथींमध्ये अंजुमन वासिउल तालीमचे अध्यक्ष सैफुल्ला फिरफिरे, प्राचार्य अझर उलडे, सरपंच, उपसरपंच, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वजीर मुकादम यांनी सूत्रसंचालन केले. हा उपक्रम स्थानिक युवकांसाठी कौशल्यविकास व रोजगार संधींसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
.........
महाबळेश्वर रोड रुंदीकरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
पोलादपूर (वार्ताहर) ः महाबळेश्वर रोडचे रुंदीकरण होत असल्याने कापडे बु, चांभारणी व कापडेखुर्द येथील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ठेकेदारांनी कोणतीही नोटीस न देता काम सुरू केले असून, शेतकरीवर्गाने दोन वेळा काम थांबवले आहे. बुधवारी पोलादपूर तहसील कार्यालयात निवेदनदेखील देण्यात आले. ज्यात जमिनीची नुकसानभरपाई, नोटीस देणे व अवैध उत्खनन थांबवणे आदी मागण्या करण्यात आल्या. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांसहित संबंधित प्रशासनाला पाठवण्यात आली आहे.
..............
चौकातील स्मृतिचिन्ह पुन्हा बसविण्याची मागणी
पेण (वार्ताहर) ः पेण नगरपालिका जवळ असणाऱ्या वीर हुतात्मा भाई कोतवाल चौकातील हातातील मशालीचे स्मृतिचिन्ह गेल्या काही महिन्यांपूर्वी काढण्यात आले होते. यासंदर्भात १ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांच्याकडे स्मृतिचिन्ह पुन्हा बसविण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जीवन शंकर पाटील यांनी केली होती. त्या मागणीला अनुसरून नगरपालिकेच्या वतीने सदरचा स्मृतिचिन्ह पुन्हा त्याच जागेवर बसविण्यात आला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता नगरपालिका चौकातील वीर हुतात्मा भाई कोतवाल चौकात बसविलेला हातातील मशालीचा स्मृतिचिन्ह काही कारणास्तव नगरपालिकेकडून काढण्यात आला होता. त्यामुळे येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाची ओळख पुसण्याचे काम होत असल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली गेली होती. त्यामुळे ठाकरे गटाचे जीवन शंकर पाटील यांनी याचा पाठपुरावा मुख्याधिकारी यांच्याकडे केला होता. याची दखल घेत अखेर ८ रोजी वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या हातातील मशालीचे स्मृतिचिन्ह पुन्हा बसविल्याने अधिकारी वर्गाचे आभार मानन्यात आले आहे.
...............
सत्यशोधक सर्वोदय संघटनेचा जलसत्याग्रह आंदोलन
पेण, ता. ९ (वार्ताहर) ः बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावरून सत्यशोधक सर्वोदय संघटनेच्या वतीने १३ ऑक्टोबर रोजी जल सत्याग्रह आंदोलन होणार आहे. २००९ पासून अपूर्ण असलेल्या धरणामुळे वरसई, जावळी, करोटी, निफाड, वाशिवली, गागोदे खुर्द या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. संघटनेने पुनर्वसन, निवाडा संपादन प्रक्रिया, जमिनीला सरसकट भाव देणे यासारख्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
........................
दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी विशेष मोहीम
मुरूड (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील बँकांमध्ये तब्बल १५८ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यामुळे ४ कोटी ७५ लाखांहून अधिक रकमेसाठी १२७ खातेदार लाभ घेऊ शकतील. खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व केवायसी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेअंतर्गत १३ ऑक्टोबरपासून शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित केल्या जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.