दारिद्र्य रेषेचे चुकीचे सर्वेक्षण
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ९ : तालुक्यातील दारिद्र्य रेषेचे २०११मधील चुकीचे सर्वेक्षण आजही गरीब नागरिकांसाठी गंभीर समस्या निर्माण करत आहे. दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबांच्या नावांची नव्या दारिद्र्य रेषेच्या यादीत नोंदणी नाही; तसेच यादी सुधारण्याचा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळे या कुटुंबांना सरकारी योजना मिळत नाहीत आणि गरजूंना अपात्र लाभार्थ्यांपेक्षा कमी सुविधा मिळत आहेत.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वांच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ खऱ्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना मिळण्याऐवजी अपात्र लाभार्थीच जास्त घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित राहिली आहेत. त्या कुटुंबांना शासकीय योजनेचा फायदा घेण्यासाठी दारिद्र्य रेषेचा सर्व्हे करण्याची गरज आहे, तशी मागणी तालुक्यात जोर धरत आहे.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना सरकारतर्फे विविध योजना लागू केल्या आहेत. स्वस्त धान्य, मोफत आरोग्य, शिक्षण, विमा, पंचायत समिती, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय जव्हार आदी सरकार विभागाच्या योजनांमध्ये सवलत; तसेच इतरही योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळत असतो. १४ वर्षे लोटली तरी जनगणना न झाल्याने गरीब कुटुंबाच्या संख्येतही वाढ झाली आहे. पूर्वी दारिद्र्य रेषेखालील बहुतांश कुटुंबे आता वर आलेली आहेत. परंतु आपली आर्थिक परिस्थिती सुधारलेली असतानाही केवळ शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जुन्याच दारिद्र्य रेषा यादीतील क्रमांकाचा वापर त्यांच्याकडून केला जात आहे. दिवसेंदिवस गरीब श्रीमंतीच्या आलेखात प्रचंड दरी निर्माण होत चालली आहे. गरजवंत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील सदस्यांना आजही मजुरीसाठी शहराची वाट धरावी लागत आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचे पोट भरावे लागत आहे.
शिधापत्रिकांची स्थिती
तालुक्यात एकूण १७१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदय योजना शिधापत्रिका १८ हजार ५८८, प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका ३२ हजार ३३३, केशरी शिधापत्रिका १४ हजार ५३० आणि शुभ्र शिधापत्रिका १८४८ आहेत. यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना तांदूळ २५ किलो आणि गहू १० किलो, तर प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना ४ किलो तांदूळ व १ किलो गहू वाटप करण्यात येत आहे. केशरी व शुभ्र शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यात येत नाही, तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची संख्या १८ हजार ५०६ इतकी आहे.
तालुका पातळीवरील आकडेवारी:
स्वस्त धान्य दुकाने: १७१
अंत्योदय योजना शिधापत्रिका: १८,५८८
प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका: ३२,३३३
केशरी शिधापत्रिका: १४,५३०
शुभ्र शिधापत्रिका: १८,४८
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या: १८,५०६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.