नवी मुंबई विमानतळ प्रकल्प :
नवी मुंबई विमानतळ आर्थिक परिवर्तनाला चालना देणार
मुंबई महानगर प्रदेशातील नव्या विकासाचा केंद्रबिंदू
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पायाभूत सुविधांच्या प्रवासातील ऐतिहासिक टप्पा मानला जात असून मुंबई महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) नव्या विकासाचे केंद्रबिंदू ठरले आहे. सिडको व एनएमआयएएल यांच्या सहकार्याने विकसित केलेले हे विमानतळ केवळ विद्यमान मुंबई विमानतळावरील ताण कमी करणार नाही, तर ते मुंबई महानगर प्रदेशाचे आर्थिक केंद्रस्थान ठरणार आहे.
नवी मुंबई विमानतळ हा विमान वाहतुकीचा प्रकल्प नाही, तर आर्थिक परिवर्तनाला चालना देणारा प्रकल्प आहे. रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीला या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. विमानतळ परिसरात अभूतपूर्व पायाभूत विकास प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांतील प्रवासाचा कालावधी केवळ २० मिनिटावर आल्याने या प्रकल्पाने कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडविली आहे. तसेच, प्रस्तावित अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर हा १२६ किमी लांबीचा महामार्ग पश्चिम, मध्य आणि हार्बर क्षेत्रांना जोडणारा असून पनवेल, भिवंडी आणि वसईसारख्या वाढीच्या केंद्रांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करणार आहे.
याचबरोबर मुंबई मेट्रो लाईन आठमुळे येत्या चार-पाच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) यांना जोडून दोन शहरातील प्रवास अधिक सुलभ करणार आहे. त्याचप्रमाणे, सध्या अंतिम टप्प्यात असलेली पनवेल-कर्जत रेल्वेलाईन नवी मुंबई, रायगड परिसरात दळणवळण अधिक सक्षम करणारी ठरणार आहे.
यामुळे या परिसरात नवे निवासी आणि औद्योगिक केंद्र विकसित होतील. या सर्व प्रकल्पांमुळे नवी मुंबई प्रदेश भारताच्या नकाशात गुंतवणुकीचे गंतव्यस्थान म्हणून उदयास येणार आहे. तर मुंबई शहराशी वाढलेली कनेक्टिव्हिटी, क्षेत्रातील अंतर्गत पायाभूत विकास आणि उपलब्ध जागेमुळे पनवेल प्रदेश देखील भविष्यात आर्थिक केंद्र म्हणून नावारुपास येणार आहे. विमानतळामुळे नवी मुंबई परिसर घर खरेदीदारांनाच नव्हे, तर कॉर्पोरेट्स, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांनाही आकर्षित करणार आहे.
नवी मुंबई विमानतळ हा फक्त एक प्रकल्प नसून, तो नवी मुंबई, पनवेल, एमएसआरडीसी, नयना आणि एमएमआरडीए या सर्व क्षेत्रांच्या प्रगतीचा नवा अध्याय आहे. येत्या काळात या भागात रिअल इस्टेट, उद्योग आणि रोजगार यांचा विकास होणार आहे. मुंबई-ठाणे महाग झाल्याने नवी मुंबई हा गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि उज्ज्वल पर्याय ठरणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अनेक अधिकारी, खाजगी संस्था, विविध शासकीय यंत्रणा, ग्रामस्थ नेते, विविध क्षेत्रांतील कामगार, मजूर, तंत्रज्ञ, अभियंते, ज्यांनी आपली जमीन आणि घरे दिली आणि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रेरणेने या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीत अमूल्य योगदान दिलेल्या सर्वांचे अभिनंदन.
- प्रकाश बाविस्कर, सीएमडी, बाविस्कर ग्रुप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.