उल्हासनगरातील वाहतुकीत बदल
उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : उल्हासनगरातील दिवाळीच्या खरेदीदारांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. कॅम्प २ मधील नेहरू चौक ते शिरू चौकदरम्यान प्रचंड होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाने तात्पुरते वाहतूक नियंत्रणाचे आदेश जारी केले आहेत. पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार १० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत काही मार्गांवर मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे, तर दुचाकींना मर्यादित परवानगी असणार आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ मधील नेहरू चौक ते शिरू चौक दरम्यानचा परिसर हे दिवाळी सणात नागरिकांच्या खरेदीसाठी सर्वाधिक गर्दीचे ठिकाण मानले जाते. जपानी मार्केट, गजानन मार्केट, तसेच अमन रोडवरील फटाके व इलेक्ट्रिकल वस्तूंची घाऊक बाजारपेठ या भागातच असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पंकज शिरसाट यांनी वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणाचे हे नियोजन उल्हासनगरातील व्यापारी व ग्राहक दोघांसाठीही सोयीचे ठरणार आहे. गर्दीच्या बाजारपेठांत शिस्तबद्ध वाहतुकीमुळे नागरिकांना निर्धास्तपणे खरेदीचा आनंद घेता येईल आणि शहरातील दिवाळीचा उत्साह आणखी उजळून निघेल.
प्रवेश बंद मार्ग
१) अमन रोडकडून नेहरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पटेल मार्ट चौक येथे प्रवेशबंदी राहील.
पर्यायी मार्ग : पटेल मार्ट येथून डावीकडे वळून हिरा मॅरेज हॉल - मधुबन चौक - गोल मैदान मार्गे पुढे इच्छितस्थळी जाता येईल.
२) नेहरू चौकाकडून शिरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवगळता इतर सर्व वाहनांना नेहरू चौक येथे प्रवेशबंदी राहील.
पर्यायी मार्ग : नेहरू चौकातून देवीभवानी चौक - गोल मैदान - उल्हासनगर नं.१ मार्गे पुढे जाता येईल.
लोडिंग-अनलोडिंग वेळा
१) दुपारी १२.३० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत : दोन्ही रस्त्यांवर लोडिंग-अनलोडिंगसाठी प्रवेश बंद राहील.
२) रात्री ००.०१ ते दुपारी १२.३० पर्यंत : लोडिंग-अनलोडिंगसाठी प्रवेश सुरू राहील.
अंमलबजावणीचा कालावधी
दिवाळीदरम्यान लागू केलेली वाहतूक अधिसूचना १० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत प्रभावी राहील. या कालावधीत पोलिसांकडून रोजचे निरीक्षण, मार्गात बदल आणि वाहतूक मार्गदर्शन व्यवस्था तैनात केली जाणार आहे.
अत्यावश्यक वाहनांना सूट
वाहतूक विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलिस वाहने, तसेच अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आपत्कालीन सेवांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
नागरिकांना आवाहन
दिवाळीच्या खरेदीदरम्यान आपल्या आणि इतरांच्या सोयीसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, अनावश्यक ठिकाणी वाहन उभे करू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे. वाहतुकीची शिस्त पाळल्यास खरेदीचा आनंद द्विगुणीत होईल, असे पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.