विद्यार्थी आत्महत्या प्रकरणांचे उमटतात तीव्र पडसाद

विद्यार्थी आत्महत्या प्रकरणांचे उमटतात तीव्र पडसाद

Published on

दोषींवर कठोर कारवाई करावी!
आश्रमशाळा प्रशासनाच्या हलगर्जीवर तीव्र संताप
वाडा, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील आंबिस्ते येथील कै. दिगंबर पाडवी आश्रमशाळेत ८ ऑक्टोबरला दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. या आत्महत्येमागील नेमके कारण शोधून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. वाडा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या आश्रमशाळेच्या प्रशासनाच्या हलगर्जीचे अनेक मुद्दे समोर आले आहेत. शाळेचे तारेचे कंपाउंड तुटलेले असल्याने विद्यार्थ्यांच्या रात्री बाहेर फिरण्यावर कोणतेही निर्बंध नव्हते, तर मध्यरात्री विद्यार्थी बाहेर पडून आत्महत्या करेपर्यंत सुरक्षा रक्षकाला त्यांच्या हालचाली कशा लक्षात आल्या नाहीत, याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर घटनेची माहिती पालकांना त्वरित न कळवता त्यांना बाहेरून कळल्याचे पालकांनी सांगितले, हादेखील प्रशासनाचा गलथानपणा मानला जात आहे.
यासंदर्भात तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांच्याशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले.

संस्थेच्या शाळांत आधीही गंभीर घटना
आश्रमशाळेचे संचालन करणाऱ्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ या संस्थेच्या इतर आश्रमशाळांमध्येही यापूर्वी गंभीर घटना घडल्या आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये याच संस्थेच्या परळी आश्रम शाळेतील एका आदिवासी विद्यार्थिनीने मुख्याध्यापकाच्या दबावाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती, हे प्रकरण दडपल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली होती. विक्रमगड तालुक्यातील माण आश्रमशाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, तर ऑगस्ट २०२४ मध्ये खुडेद येथील आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा आजारावर योग्य उपचार न झाल्याने मृत्यू झाला होता.

खातेनिहाय चौकशीची मागणी
या संस्थेच्या आश्रमशाळांमधील आत्महत्या, सर्पदंश आणि उपचाराअभावी झालेले मृत्यू अशा सर्व घटनांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी होत आहे. सुरक्षेअभावी, तातडीच्या उपचाराअभावी मुलांचे बळी जात असतील आणि त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण होत असेल, तर हे मृत्यू ‘कोठडीतील मृत्यू’ असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते गोविंद पाटील यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष, संबंधित मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com