डॉक्टरकडून रुग्णावर अतिप्रसंगाचा प्रयत्न
नवी मुंबई, ता.११ (वार्ताहर)ः ऐरोली सेक्टर ६ मधील एका खासगी रुग्णालयामधील उपचारासाठी दाखल २८ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणाता रबाळे पोलिसांनी डॉक्टरविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
ऐरोली सेक्टर-६ मध्ये २९ सप्टेंबर रोजी पीडित तरुणी उपचारांसाठी दाखल झाली होती. २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास डॉक्टरने तपासणीसाठी वॉर्डमध्ये जाऊन पीडित तरुणीची तपासणी केली. त्यानंतर तिला गप्पा मारण्यासाठी केबिनमध्ये बोलावून घेतले. पीडित तरुणी पहाटे ३.३० वाजता डॉक्टरच्या केबिनमध्ये गेल्यानंतर, डॉक्टरने वैयक्तिक समस्यांची चर्चा करताना तिच्यासोबत शारीरिक जवळीक केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार डॉक्टर दारूच्या नशेत होता.याप्रकरणी पीडित तरुणीने रबाळे पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध विनयभंग, शारीरिक अत्याचार आणि धमकी देणे अशा गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल केला आहे.