खडकपाडा पोलीसांनी नागरिकांना परत केले हरवलेले मोबाईल
खडकपाडा पोलिसांकडून हरवलेले मोबाईल नागरिकांना परत
कल्याण, ता. ११ (वार्ताहर): नागरिकांचे हरवलेले महागडे मोबाईल फोन खडकपाडा पोलिसांनी शोधून शनिवारी (ता.११) संबंधितांना परत केले. कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या निर्देशानुसार खडकपाडा पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या हस्ते हे मोबाईल फोन नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. या कारवाईत एकूण २५ मोबाईल फोन परत करण्यात आले, ज्यांची एकत्रित किंमत सुमारे ३ लाख ६५ हजार रुपये इतकी आहे. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि दिलासा स्पष्टपणे दिसत होता.
मोबाईल हस्तांतरण कार्यक्रमासोबतच ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून ''सायबर जनजागृती उपक्रम'' देखील यावेळी राबवण्यात आला. सध्या वाढत असलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना लक्षात घेता, सायबर फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारी खबरदारी, सुरक्षित इंटरनेट वापराचे नियम, तसेच संशयास्पद लिंक आणि कॉल कसे टाळायचे, याबाबत नागरिकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एसीपी कल्याणजी घेटे यांनी नागरिकांना आवाहन केले की, जर कोणी सायबर फ्रॉडचा बळी ठरले, तर त्यांनी तात्काळ १९३० किंवा १९४५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. या माध्यमातून तातडीने मदत मिळू शकते आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान टाळता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.