रेडिमेड दिवाळी फराळाला वाढती मागणी

रेडिमेड दिवाळी फराळाला वाढती मागणी

Published on

फराळातून घरखर्चाची बेगमी
दिवाळीत तयार पदार्थांना मागणी, बचत गटातील महिलांना रोजगार
शुभांगी पाटील ः सकाळ वृत्तसेवा
तुर्भे, ता. ११ : दिवाळीत प्रत्येकाच्या घरात फराळ तयार केला जातो. पण सध्याची बदलती जीवनशैली, नोकरी-व्यवसायानिमित्त महिलावर्गाची होणारी धावपळ यामुळे गेल्या काही वर्षांपासून तयार पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यातूनच रोजगार निर्मिती तर होतच आहे, पण महिला बचत गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या शेकडो महिलांच्या घरखर्चाची बेगमी होत आहे.
दिवाळी जवळ आल्याने घरोघरी फराळ बनवण्याच्या तयारीला वेग आला आहे. काही जण घरगुती फराळ तयार करतात, तर बहुतांश नागरिक बचत गट, स्वीट मार्टमधून फराळाचे पदार्थ खरेदी करतात. नवी मुंबई परिसरात अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यातून फराळाची विक्री केली जाते. पण घरगुती चवीसाठी अनेक जण महिला बचत गटांनी तयार केलेल्या फराळाला पसंती देत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्रीनंतर आता दिवाळीसाठी शहरातील महिला बचत गट तयारीला लागले आहेत. या काळात अनेकांना रोजगार उपलब्ध होत असतो. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
----------------------------------------
निवडणुकांमुळे विशेष मागणी
- फराळासाठी लागणारे सामान, वाहतूक खर्च वाढल्याने फराळाच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात. बचत गटांनीदेखील फराळाच्या किमतीत यंदा वाढ केली आहे. याशिवाय करंजी, अनारसे नगाऐवजी किलोला विकले जात आहेत, जेणेकरून ग्राहकांना फराळ घेताना, तर बनवणाऱ्यांना विक्रीतून दोन पैसे कमावण्याची संधी आहे.
- निवडणुकीमुळे इच्छुक उमेदवारांकडून घरगुती पाकीटबंद फराळाला मागणी वाढल्याने सध्या बचत गटांतील महिलांना रोजगार मिळाला आहे. फराळातून चांगला नफा मिळत असल्याने अनेक महिला घरगुती फराळ बनविण्याच्या छोटेखाणी व्यवसायात उतरल्या आहेत. नवी मुंबईतील बहुतांश बचत गटांकडून दिवाळी फराळाच्या ऑर्डर घेतल्या जातात.
-----------------------------
व्यवसायाला स्पर्धात्मक स्वरूप
महिला बचत गटातील महिलांनी भाजणी, चकली, पोहे, चिवडा, शंकरपाळी, लाडू, करंजी असे पारंपरिक पदार्थ ३०० ते ८०० रुपये प्रति किलो दराने विक्रीस ठेवले आहेत. परवडणारे दर, घरगुती चवीमुळे हॉटेल व्यावसायिक, राजकीय नेते, नोकरदारवर्गाकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. विशेष म्हणजे गावाकडच्या चवीमुळे परदेशातही घरगुती फराळाला विशेष मागणी आहे. समाजमाध्यमांमुळे अनेकांना फराळाची जाहिरात करण्याची संधी उपलब्ध झाल्याने व्यवसायाला स्पर्धात्मक स्वरूप आले आहे.
-----------------------------------
पदार्थ सध्याचे गेल्या वर्षीचे दर (किलोला)
भाजणी चकली ५५० ५००
गोड शंकरपाळी ५५० ५००
खारी शंकरपाळी ५५० ५२०
करंजी ६५० ६५०
रवा लाडू ५५० ५५०
रवा लाडू (तुपाचे) ६५० ६००
बेसन लाडू (तुपाचे) ७५० ६५०
दामटीचे लाडू (तुपाचे)६५० ५५०
बुंदीचे लाडू ६५० ५५०
तिखट शेव ५०० ५५०
चिवडा ५५० ५००
भडंग (कुरमुरे) ४०० ३५०
अनारसे ७०० ६५०
मेथी-डिंकलाडू (तूपाचे)१,१०० १,०००
ड्रायफ्रूट लाडू १,३०० १,२००
भाजणी चकली पीठ ३०० २७५
अनारसे पीठ ३०० २७५
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः---------------------------------------------------
मागील काही वर्षांपासून बचत गटांच्या माध्यमातून दिवाळी फराळ बनवला जातो. मोठ्या प्रमाणात फरळाच्या ऑर्डर येतात. सर्वत्र स्पर्धा पाहायला मिळत असल्याने फराळाचे दर कमी-जास्त होत आहेत. मात्र नेहमीचे ग्राहक आमच्याकडेच येतात.
- मनीषा शिंदे, माता सरस्वती महिला बचत गट, सानपाडा
-------------------
सध्याच्या धावपळीमुळे घरगुती फराळ बनवण्यास वेळ मिळत नाही. त्यात अनेक ठिकाणी घरगुती चवीचे फराळ मिळत असल्याने रेडिमेड फराळ शक्यतो मराठी कुटुंबांकडूनच खरेदी केला जातो.
- सायली भोईर, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com