लाडक्या बहिणींचा आत्मनिर्भरतेचा ''फराळ''

लाडक्या बहिणींचा आत्मनिर्भरतेचा ''फराळ''

Published on

लाडक्या बहिणींचा आत्मनिर्भरतेचा ''फराळ''
योजनेच्या पैशातून ठाण्यातील ५० महिलांचे उद्योग क्षेत्रात पाऊल

वंशिका चाचे : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : राज्य सरकारच्या ''लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या दीड हजार रुपयांच्या अनुदानाचा उपयोग केवळ खर्चासाठी न करता, तो गुंतवणुकीसाठी आणि स्वयंउद्योजिका बनण्यासाठीही करता येतो, याचा आदर्श ठाण्यातील महिलांनी घालून दिला आहे. या योजनेतून मिळालेल्या निधीचा वापर करून ठाण्यातील सुमारे ५० महिलांनी बचत गट तयार करत दिवाळी फराळाचा व्यवसाय सुरू केला आहे. या उपक्रमामुळे त्यांना आर्थिक स्थैर्यासोबतच स्वावलंबन आणि आत्मविश्वासाची नवी दिशा मिळाली आहे.

दिवाळीत नोकरदार महिलांना फराळ बनवण्यासाठी वेळ मिळत नसल्याने, तयार फराळाला मोठी मागणी असते. नेमकी ही गरज ओळखून ठाण्यातील ''जय जय रघुवीर समर्थ'' आणि ''सावित्री'' या दोन महिला बचत गटांनी यंदा दिवाळीनिमित्त पारंपरिक फराळ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. नामदेव वाडी, सिद्धेश्वर तलाव, पाटील वाडी आणि रमाबाई नगर या भागातील ५० हून अधिक महिला यात सहभागी झाल्या आहेत. लाडक्या बहिण योजनेतून मिळालेला अनुदानाचा पैसा त्यांनी एकत्र बचत गटात जमा केला आणि त्याच निधीतून सुमारे ५०० किलोहून अधिक फराळ तयार करून विक्रीस ठेवला आहे.

घरगुती चवीला परदेशातून मागणी
महिलांनी भाजणी चकली, शंकरपाळी, चिवडा, करंजी, लाडू असे पारंपरिक पदार्थ उत्तम दर्जाचे तेल आणि शिधा वापरून घरगुती पद्धतीने तयार केले आहेत. २०० रुपये ते ५०० रुपये प्रति किलो दराने या फराळाची विक्री सुरू आहे. या पदार्थांमध्ये मायेची जोड असल्याने त्यांची चव बाजारातील फराळापेक्षा वेगळी ठरत आहे. घरगुती चव, वाजवी दर आणि स्वच्छ, दर्जेदार तयारीमुळे ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी ४०० किलो फराळाची विक्री झाली होती, तर यंदा मागणी लक्षणीय वाढली आहे. नोकरदार महिला, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक तसेच राजकीय मंडळींकडून मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, या फराळाला परदेशातूनही मागणी येत आहे. त्यामुळे या वर्षी या ''लाडक्या बहिणींनी'' ५०० किलोहून अधिक फराळ तयार केला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आवाहनाला प्रतिसाद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिण योजनेचा उपयोग महिलांनी स्वयंरोजगारासाठी करावा, असे आवाहन वारंवार केले आहे. ठाण्यावर विशेष प्रेम असलेल्या शिंदे यांनी एका कार्यक्रमादरम्यान याच महिलांना बचत गट तयार करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला होता. ''रोजगारासाठी मुंबईकडे पाहण्याऐवजी स्वतः काहीतरी निर्माण करा आणि इतर महिलांनाही रोजगार द्या,'' असे ते म्हणाले होते. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत या महिलांनी बचत गट तयार करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यातून इतर महिलांनाही रोजगार निर्माण झाला आहे.

महिलांना आर्थिक बळ
''लाडक्या बहिण योजनेतून मिळालेला निधी आम्ही एकत्र गुंतवून हा उपक्रम सुरू केला. यामुळे आमचे आर्थिक बळ वाढले, आत्मविश्वास वाढला आणि इतर महिलांनाही प्रेरणा मिळाली. असे बचत गट प्रमुख जया कुंभेकर यांनी सांगितले. तर
''गेल्या दहा वर्षांपासून आम्ही नागरिकांना दर्जेदार घरगुती सेवा देत आहोत. महिलांनी अशा योजनांचा योग्य उपयोग करून स्वतःसाठी रोजगार निर्माण करावा, हेच आमचं उद्दिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सुवर्ण खेरटकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com