कुर्ल्यात रेशनिंग धान्य टेम्पो जप्त
कुर्ल्यात रेशनिंग धान्याचा टेम्पो जप्त
काळाबाजार करणाऱ्या दोघांवर गुन्हा
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः कुर्ला पोलिसांनी तब्बल दोन हजार ३८ किलो रेशनचा सरकारी तांदूळ एका टेम्पोतून ताब्यात घेऊन दोघांना अटक केली आहे. अभिषेक राजभर आणि अजयकुमार गुप्ता अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत ‘आई-बाबा फाउंडेशन’ या संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश रमेश मौर्य यांनी मुंबईतील संभाव्य आणि होत असलेल्या रेशन काळ्याबाजाराबाबत पोलिस ठाणे तसेच संबंधित शिधावाटप कार्यालयाबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार कुर्ला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या दोघांवर आता जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार गुन्हा नोंद करून हा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
तक्रारदार रामराजे एकनाथ भोसले हे कुर्ला शिधावाटप कार्यालयात निरीक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांनी याबाबत कुर्ला पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी रेशनवरील तांदूळ आणि गहू असलेला एमएच ०३ ईजी ८९६६ क्रमांकाचा टेम्पो ताब्यात घेतला आहे. त्यात ४१ गोणी तांदूळ आणि १०० किलो गहू होता. या मुद्देमालाची किंमत जवळपास ८५ हजार ४५ रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली.
कुर्ला पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे. हा मुद्देमाल कुर्ला येथील ३२ ई, शिधावाटप कार्यालय येथील दुकानातील होता. मात्र तो दुकानात न जाता मधल्या मध्ये त्याचा अपहार केला जात होता. हा मुद्देमाल रात्री आठच्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील पाइपलाइन, ब्राह्मणवाडी भागात पोलिसांनी ताब्यात घेतला. या टेम्पोवर चालक अभिषेक राजभर तर हमाल अजयकुमार भालुराम गुप्ता होता. ते कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे नगरात उभ्या असलेल्या गाडीत विविध रंगांच्या गोणींमध्ये हा तांदूळ भरीत होते. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार भेट दिली असता, या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आई बाबा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश मौर्य यांनी याबाबत कुर्ला पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक मनीष मोगरे यांनी या आरोपींसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.