उरण तालुक्यात धुळीचे साम्राज्य!
उरण तालुक्यात धुळीचे साम्राज्य
वाहनचालक हैराण; श्वसनाचे आजार वाढण्याची भीती
उरण, ता. ११ (वार्ताहर) : पावसाचा जोर कमी झाल्यानंतर उरण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर चिखलाऐवजी आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर उरण शहर आणि परिसरातील रस्त्यांवरून उसळणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरील तात्पुरत्या दुरुस्तीच्या कामांमुळे ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून, नागरिकांच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.
यंदा उरण तालुक्यात मागील चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात पर्जनवृष्टी झाली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची अशरक्ष: चाळण झाली. त्यामुळे सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी माती आणि ग्रीट वापरले गेले. मात्र या मातीचे थर उन्हात कोरडे पडल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ती धूळ हवेत उडत आहे. त्यामुळे रस्त्यावर सतत धुळीचे ढग निर्माण होत आहेत. मोटारसायकलस्वारांना रस्ता नीट दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. खड्डे बुजवण्यासाठी मातीमिश्रित ग्रीट वापरली गेल्याने आता ऊन पडल्यावर ही माती हवेत उडत असून, मोटारसायकल चालवणे धोकादायक झाले आहे, असे स्थानिक प्रवासी सनी पाटील यांनी सांगितले. कोप्रोली–खोपटा, दिघोडे–चिर्ले इत्यादी मार्गांवर धुळीची समस्या अधिक तीव्र आहे. सिडको आणि पीडब्ल्यूडीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, सर्वसामान्यांना श्वसनाचे आजार, खोकला, अॅलर्जी यांसारख्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. याकडे संबंधित विभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
.................
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांनी सांगितले, की दिघोडे मार्गाचे काम सुरू आहे. तसेच कोप्रोली–खोपटा मार्गासाठी वाहतुकीची परवानगी मिळताच काम सुरू होईल. या कामानंतर धुळीची समस्या कमी होईल. नागरिकांनी तातडीने रस्त्यांची योग्य देखभाल करून धुळीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. उपाययोजना न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिडकोविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.