प्रकल्पाचे काम देण्यापूर्वी इतिहास तपासूनच काम द्या

प्रकल्पाचे काम देण्यापूर्वी इतिहास तपासूनच काम द्या

Published on

प्रकल्पाचे काम देण्यापूर्वी इतिहास तपासा
एकनाथ शिंदे : नागरिकांची विश्वासार्हता जपण्याचे म्हाडाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : म्हाडाने नागरिकांचा विश्वास कायम जपून कामाचा दर्जा राखण्यावर भर द्यावा तसेच कोणत्याही विकसकाला प्रकल्पाचे काम देण्यापूर्वी त्याचा इतिहास तपासूनच काम द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाण्यात शनिवारी (ता. ११) डॉ. काशिनाथ घाणेकर येथे आयोजित कोकण विभागीय म्हाडाच्या घरांच्या सोडतीदरम्यान ते बोलत होते. या वेळी त्यांनी सांगितले, की घर म्हणजे केवळ चार भिंती नसून, ते प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आणि आत्मसन्मानाचा आधार आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचे काम म्हाडा पारदर्शकपणे करीत आहे.
सद्य:स्थितीत म्हाडावर जनतेचा वाढता विश्वास दिसत असून, या सोडतीत ५ हजार ३५४ घरांसाठी एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
आजपर्यंत म्हाडाने सुमारे नऊ लाख घरे उपलब्ध करून दिली असून, आगामी काळात ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर परिसरात ६० हजार घरे उभारली जाणार आहेत. कामामध्ये दिरंगाई होऊ नये म्हणून यापुढे विकसकांना तीन वर्षांचे भाडे आगाऊ ठेवण्याची अट घालूनच कामे दिली जातील. याशिवाय कामगार, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र गृहनिर्माण योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
..............................
सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी कटबिद्ध
म्हाडा सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले. मागील तीन वर्षांत घरांच्या लॉटरीची संख्या व वितरित घरांची संख्या लक्षणीय वाढली आहे. क्लस्टर योजनेद्वारे पुढील पाच वर्षांत दोन लाख तर एकूण आठ लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा म्हाडाचा मानस आहे, ज्यात गिरणी कामगार आणि डबेवाले यांसारख्या गटांचा समावेश असेल.
...................
सिडकोही देणार परवडणारी घरे
सिडकोची घरेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे आता म्हाडासोबत सिडकोच्या माध्यमातूनदेखील सर्वसामान्यांना परडवतील अशी घरे उभारली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
...............................
मी नाशिकमध्ये शेतकरी आहे, परंतु मला मुंबईत घर असायला हवे, असे माझे स्वप्न होते. त्यासाठी मागील चार वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. अखेर आज २० टक्के योजनेत मला हक्काचे घर मिळाले आहे.
- शंकर आव्हाड, लाभार्थी
.................
मी कलाकार कोट्यातून घरासाठी अर्ज केला होता. पहिल्या प्रयत्नातच माझे हक्काचे आणि स्वप्नातील घर सत्यात उतरले आहे.
- पूजा शिंदे, कलाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com