पान ४
शिवसेनेकडून अंबरनाथमध्ये फराळ साहित्य वाटप
अंबरनाथ (वार्ताहर) : अंबरनाथमधील गरीब व गरजू नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेना आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने फक्त दहा रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे.
अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात हे फराळ वाटप होणार असून यामध्ये रवा, मैदा, साखर, पोहे, डाळ, तेल, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ आणि चिवडा मसाला अशी एकूण नऊ वस्तू फक्त दहा रुपयांत नागरिकांना देणार आहे. या उपक्रमाअंतर्गत रविवारी (ता. १२) अंबरनाथ (पश्चिम) येथील भवानी चौकात तर मंगळवारी (ता. १४) अंबरनाथ (पूर्व) येथील शिवसेना शहर शाखेत फराळ साहित्याचे वाटप होणार आहे. यासाठी कूपन नागरिकांना वितरित केल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि युवासेना निरीक्षक ॲड. निखिल वाळेकर यांनी दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, प्रकाश डावरे, नभा आढाव, भरत पेटकर, पोपट गारकर, युवासेना शहराध्यक्ष स्वप्नील भामरे, उपशहराध्यक्ष अजय गारकर, ऋषी डावरे आणि जय भवानी सेवा संस्थेचे सदस्य आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कमी खर्चात आवश्यक साहित्य उपलब्ध होत असल्याने अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
अजय पाटील यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
अंबरनाथ (वार्ताहर) ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथमध्ये मनसेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता मनसेचे शहर उपाध्यक्ष अजय पाटील यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
डोंबिवलीतील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. अजय पाटील यांच्यासह सूरज पाटील, तुषार रोकडे, अभिषेक सिंग आणि इतर मनसे कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यामुळे अंबरनाथच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. भाजपचे राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील, शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वाहनाच्या धडकेत दोन पोलिस जखमी
अंबरनाथ (बातमीदार) ः अंबरनाथ पूर्व भागातील म्हाडा सर्कल परिसरात मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाहनचालकाविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस ठाण्यात हवालदार अजय कुमावत आणि पोलिस नाईक व्हटकर हे म्हाडा सर्कल परिसरात दुचाकीवरून शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्री गस्त घालत होते. त्या वेळी सीएनजी पंपाजवळ समोरून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांना किरकोळ दुखापत झाली असून, दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी विष्णू ठाकूर (वय २०)विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.