लोणेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता शिर्के यांची बिनविरोध निवड
लोणेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता शिर्के
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव तालुक्यातील लोणेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संगीता शिर्के यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवडणूक प्रक्रिया सरपंच प्रकाश टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडली. यापूर्वीच्या उपसरपंच सुजाता टेंबे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने संबं.िधित रिक्त झाले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवार संगीता शिर्के यांनीच एकमेव अर्ज दाखल केला. कोणताही विरोधक उमेदवार नसल्याने निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. सरपंच प्रकाश टेंबे यांनी निवड प्रक्रिया पूर्ण करून संगीता शिर्के यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली. या प्रसंगी ग्रामसेवक नरेंद्र घाडगे यांनी सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास माजी सरपंच व विद्यमान सदस्य रवींद्र टेंबे, समाधान करकरे, प्रमोद करकरे, ज्योती ढेपे, शिवाजी ढेपे, तसेच लेखनिक रमेश टेंबे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष करकरे आदी उपस्थित होते. या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख अरूण चालके, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्पणा घोसाळकर, तसेच उस्सरघर नवघरवाडीचे ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवड झालेल्या उपसरपंच संगीता शिर्के यांचे शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे लोणेरे ग्रामपंचायतीत महिलांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
.................
रेपोली ग्रामस्थांकडून गुरुजनांचा कृतज्ञता सोहळा
माणगाव (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील रेपोली गावात रायगड जिल्हा परिषद शाळेत हृदयस्पर्शी कृतज्ञता सोहळा पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर महाले व उपशिक्षिका संध्या जायभाये यांची बदली झाल्याने त्यांच्या सहा वर्षांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि पालकांनी मनापासून आदर व्यक्त केला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून आपल्या आवडत्या शिक्षकांना भावनिक निरोप दिला. गावाध्यक्ष रघुनाथ बेंदुगडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष कल्पेश पिसाळ, सिद्धेश शिगवण, शंकर जांबरे, माजी उपसरपंच गोपाळ नाडकर, शरद मोरे यांनी आपल्या मनोगतात महाले व जायभाये यांच्या कार्याची प्रशंसा केली. गेल्या सहा वर्षात त्यांनी शाळेचे सुशोभीकरण, शैक्षणिक दर्जा उंचावणे, तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व सांस्कृतिक उपक्रमात सहभागासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे रेपोली शाळेने जिल्हास्तरावर वेगळी ओळख निर्माण केली. या सोहळ्यात नव्याने आलेल्या शिक्षकांचेही स्वागत करण्यात आले. महाले यांनी घालून दिलेल्या शैक्षणिक परंपरेला आम्ही पुढे नेऊ, अशी ग्वाही नव्या शिक्षकांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनीने तर आभार प्रदर्शन समिती सदस्यांनी केले. गावातील ज्येष्ठ नागरिक, पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............
गांजवणे येथे नैसर्गिक शेतीविषयी शेतकरी गट प्रशिक्षण
पोलादपूर (वार्ताहर) : तालुक्यातील गांजवणे येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ‘बळीराजा शेतकरी गट’ प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षणात तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे, मंडळ कृषी अधिकारी सुनील धनवट, दत्तात्रय शिंदे, उपकृषी अधिकारी श्रीरंग मोरे, पोलिस पाटील राजेंद्र झाडाने, गटाध्यक्ष हरिश्चंद्र कदम आदी उपस्थित होते. कृषी अधिकारी फडतरे यांनी शेतकऱ्यांना बायो-इनपुट रिसोर्स सेंटर युनिटविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवत जैविक निविष्ठांच्या वापराचे फायदे समजावले. या प्रशिक्षणात २३ शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांना स्वनिधी भरून नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीविषयी नवचैतन्य निर्माण झाले.
...........
खोपोलीच्या डॉ. रामहरी धोटे शिशुमंदिर शाळेचा क्रीडाक्षेत्रात डंका
खोपोली (वार्ताहर) : खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. रामहरी धोटे शिशुमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये यश संपादन केले आहे. सुब्रोतो कप फुटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि कॅरम या स्पर्धांमध्ये शाळेच्या खेळाडूंनी एकाच वेळी अनेक विजेतेपदे पटकावली. १७ वर्षाखालील मुलींचा व १५ वर्षाखालील मुलांचा संघ सुब्रोतो कप विजेता ठरला. १७ वर्षाखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने प्रथम, तर १४ वर्षाखालील मुलींनी द्वितीय पारितोषिक पटकावले. कुस्ती स्पर्धेत वेद मरागजे याने रौप्यपदक मिळवले. बुद्धिबळात विनंती वाघ, आर्था आणि तीर्था देशमुख आदींनी उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, सचिव किशोर पाटील आणि विजय चुरी यांनी खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. ही यशशृंखला आमच्या संस्थेच्या क्रीडाप्रेमी संस्कारांची फलश्रुती आहे, असे त्यांनी नमूद केले. शाळेच्या या यशामुळे खोपोली शहरासह संपूर्ण तालुका अभिमानाने उजळला आहे.
.....................
प्रिया पाटील ठरली रायगड फोटो सुंदरी
अलिबाग (वार्ताहर) ः रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या फोटो एक्स्पोमध्ये छायाचित्रकारांना मॉडेल फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी संदर्भात ज्ञान अवगत व्हावे, त्याचबरोबर फॅशन फोटोग्राफीचा अनुभव मिळावा, या उद्देशाने ''रायगड फोटो सुंदरी २०२५'' या फॅशन शो ची स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत अलिबागच्या प्रिया पाटील हिने रायगड फोटो सुंदरीचा किताब पटकवला. जिल्ह्यातील २६ स्पर्धक प्राथमिक फेरीत सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे कोरिओग्राफर गौरव पाटील यांनी निवडक १४ स्पर्धकांची अंतिम फेरीत निवड केली.
वेस्टर्न वेशभूषा परिधान करून रॅम्पवॉक करणाऱ्या या स्पर्धेकांमधून अलिबागची प्रिया पाटील प्रथम, सिद्धी वाकडे द्वितीय तर पुजा बांधरकर हिने तिसरा क्रमांक पटकवला. विजयी स्पर्धकांना पेण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण मुंबईतील प्रसिद्ध छायाचित्रकार तृप्ती नाईक आणि ठाणे येथील फॅशन फोटोग्राफर राजेंद्र तुपे यांनी केले. यावेळी फोटोग्राफर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक सुभेकर, विद्यमान अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, सचिव आनंद निंबरे, खजिनदार जितेंद्र मेहता, सहसचिव दीपक बडगुजर, सल्लागार दादा आर्ते, कोअर कमिटी सदस्य अनिरुद्ध जोशी, अविनाश राऊत, सुशिल घाटवळ, निलेश शिर्के, चैतन्य पाटील, संदीप म्हात्रे, सर्व तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि फोटोग्राफर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..................
सीएफआयतर्फे मुलांना दिवाळी भेटवस्तूचे वाटप
पेण (वार्ताहर) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चिल्ड्रन्स फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे प्रतिपाली आणि अप्रतिपाली मुलांना दिवाळी भेटवस्तू वाटप कार्यक्रम आनंदात पार पडला. सीएफआयचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या हस्ते नगर येथील कार्यालयात भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. या भेटीत साबण, कंदील, खाऊ, रांगोळी साहित्य, तसेच मुलांसाठी खेळण्यांचे सेट यांचा समावेश होता. सोशल वर्कर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांनी आनंदाने भेटवस्तू स्वीकारल्या. पालकांनी सीएफआय संस्थेचे आणि डॉ. देशमुख यांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हसू आले होते.
..............................
इंडियन प्लॅनेटरी सोसायटीच्या वैज्ञानिक पदावर संदीप जाधव
पेण (वार्ताहर) : खगोलशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित इंडियन प्लॅनेटरी सोसायटीच्या वैज्ञानिक पदावर पेण तालुक्यातील उंबर्डे गावातील रहिवासी वैज्ञानिक संदीप अनंत जाधव यांची नियुक्ती झाली आहे.
ज्येष्ठ वैज्ञानिक आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. जे. जे. रावल यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. जाधव यांनी आपल्या गावात पहिले तारांगण उभारून ग्रामीण भागात विज्ञानाची आवड निर्माण केली होती. नेहरू तारांगणात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चिकाटी व जिद्दीच्या बळावर अंतरिक्ष संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केली आहे. सध्या ते आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पावर कार्यरत असून लवकरच त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध होणार आहेत. त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. विविध संस्थांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.