स्त्रीभ्रूण हत्येविरोधातील लढ्याला यश

स्त्रीभ्रूण हत्येविरोधातील लढ्याला यश

Published on

स्त्रीभ्रूणहत्येविरोधातील लढ्याला यश
रायगड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ, जनजागृतीला यश
सायली रावले ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १२ ः रायगड जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्येविरोधातील जनजागृती, गर्भलिंग निदान, गर्भपाताला प्रतिबंध करणाऱ्या विविध कायद्यांची कठोर अंमलबजावणी होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ९७७ वर गेला आहे.
आधुनिक युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहेत. यामुळेच गेल्या काही वर्षांत समाजाच्या विचारसरणीमध्ये बदल घडून येत आहे. तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि स्त्री जन्माचे स्वागत, जननी सुरक्षा योजनांच्या जनजागृतीतून मुलींच्या जन्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याचा परिणाम जन्मदरात झालेली वाढ दर्शवित आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या अडीच वर्षांत मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ झाली असून, जानेवारी ते सप्टेंबर २०२५मध्ये १२ हजार ७१७ मुलांमागे ११ हजार ५९५ अशी मुलींच्या जन्मदराची नोंद करण्यात आली आहे. गर्भनिदान प्रतिबंधक कायदाच्या कडक अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात लिंगनिदान तसेच गर्भपातासारखे प्रकार नियंत्रणात आले आहेत. तसेच आरोग्य सेवा-सुविधांमधील बदलामुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.
-------------------------------
नवरात्रोत्सवात ३१ मुलींचा जन्म
अलिबाग जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातून गरोदर माता प्रसूतीसाठी दाखल होतात. नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांत तब्बल ३१ मुलींचा जन्म झाला आहे. २२ ते २९ सप्टेंबरदरम्यान घरात लक्ष्मी आल्याचा आनंद कुटुंबांनी साजरा केला.
-----------------------------
मुले, मुलींच्या जन्मदराची आकडेवारी
२०२३ - मुले १९ हजार १८९
मुली - १८ हजार १००
इतर - ६
एकूण - ३७ हजार २९५
२०२४ मुले - १७ हजार ७०१
मुली - १६ हजार १२७
इतर - २
एकूण - ३३ हजार ८२९
२०२५ - मुले - १२ हजार ७१७
मुली - ११ हजार ५९५
इतर - ०
एकूण - २४ हजार ३१२
--------------------------------------
जिल्हा रुग्णालयामार्फत प्रत्येक कार्यक्रमापूर्वी स्त्री-पुरुष समानतेबाबतची शपथ दिली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक सोनोग्राफी सेंटरमध्ये लिंगनिदान तसेच गर्भपाताविरोधात असणाऱ्या कायद्याबाबत माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावले आहेत. शिवाय जिल्हा रुग्णालयातर्फे वर्षभराच्या कालावधीत सोनोग्राफी सेंटर, फर्टिलिटी सेंटरचे लेखापरीक्षणही करण्यात येते.
- डॉ. शीतल जोशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग

Marathi News Esakal
www.esakal.com