स्वपुनर्विकासासाठी नवी मुंबई पालिकेचा पुढाकार
स्वपुनर्विकासासाठी नवी मुंबई पालिकेचा पुढाकार
मालमत्ता प्रदर्शन केंद्रांमध्ये स्टॉल उभारून नागरिकांना मार्गदर्शन
वाशी, ता. १२ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरातील सिडकोच्या इमारती हळूहळू जीर्ण होऊ लागल्या असून अनेक ठिकाणी अतिधोकादायक स्थितीत पोहोचल्या आहेत. परिणामी, शहरातील अनेक इमारतींच्या पुनर्विकासाचे वेध नागरिकांना लागले आहेत. यामुळे शहरात अनेक सामाजिक संस्था, राजकीय प्रतिनिधी तसेच महापालिकेच्या वतीने मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन सुरू झाले आहे.
नवी मुंबई महापालिकेने या प्रक्रियेत पुढाकार घेतला असून, पालिकेकडून मालमत्ता प्रदर्शन केंद्रांमध्ये स्टॉल उभारून नागरिकांना पुनर्विकासाबाबत माहिती आणि मार्गदर्शन दिले जात आहे. यासोबतच नगरविकास विभागाद्वारे नागरिकांना पुनर्विकास व स्वपुनर्विकासासाठी शिबिर घेण्याची योजना आखण्यात आली आहे. या शिबिरांमध्ये सोसायटीच्या पदाधिकारी तसेच रहिवासी सहभागी होऊन आवश्यक कागदपत्रे, पुनर्विकास करार, बांधकाम गुणवत्तेचे परीक्षण आणि नगररचना विभागाच्या मार्गदर्शनाखाली इतर प्रक्रिया शिकू शकतात. महापालिकेच्या माहितीनुसार, गतवर्षी इतिहासात प्रथमच ८२६.१२ कोटी रुपये मालमत्ता कर वसुली करण्यात आली होती. यापैकी, पुनर्विकास प्रकल्पांच्या परवानगीमुळे सुमारे ७८ कोटी रुपये वाढीव उत्पन्न प्राप्त झाले. नगररचना विभागाच्या अंदाजानुसार, येत्या पाच वर्षांत शहरातील पुनर्विकास प्रकल्पांमुळे पालिकेच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होईल. त्यामुळे शहराच्या वित्तीय विकासासाठी पुनर्विकास प्रकल्प महत्त्वाचे ठरत आहेत.
................
सध्या वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, बेलापूर आणि इतर विभागांमध्ये ३० वर्षे जुने इमारती पुनर्विकासासाठी सज्ज होत आहेत. नागरिकांनी विविध संस्थांच्या माध्यमातून शिबिरांमध्ये सहभागी होऊन पुनर्विकासाबाबत माहिती घेतली आहे. महापालिकेने सीवूड्स येथील गृहविक्री प्रदर्शनात स्टॉल उभारून नागरिकांना पुनर्विकासाबाबत सल्ला दिला. नगरविकास विभागाच्या मदतीने सोसायटींच्या बैठकीत सभासदांचे एकमत निर्माण करणे, करार तयार करणे, बांधकाम गुणवत्तेचे परीक्षण आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे यामध्ये सहकार्य केले जात आहे. याशिवाय, नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी बँका आणि वित्त संस्थांकडून कर्ज किंवा निधी मिळवून देण्यास महापालिका सहकार्य करीत आहे.
........................
कोट
नवी मुंबईत सध्या पुनर्विकास प्रकल्प होत आहे. या पुनर्विकासाबाबत योग्य मार्गदर्शन होण्यासाठी पालिकेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. पालिकेकडून प्रापर्टी प्रदर्शनामध्येदेखील स्टॉल लावला होता. तर येत्या काळात शिबिरदेखील भरवण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी येणाऱ्या इमारतीच्या प्रतिनिधींनादेखील सहकार्य करण्यात येणार आहे.
- सोमनाथ केकाण, सहाय्यक नगररचना संचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.