कल्याण-डोंबिवलीत धुळीचा कहर; नागरिक त्रस्त, व्यापारी हैराण
कल्याण-डोंबिवलीत धुळीचा कहर
नागरिक त्रस्त, व्यापारी हैराण; श्वसनासंबंधी आजारांची शक्यता
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : पावसाळा संपताच कल्याण-डोंबिवली परिसरात रस्त्यांची धूळधाण सुरू झाली आहे. शहरातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्ते खड्डेमय अवस्थेत असल्याने वाहने गेल्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. या धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असून, दुकानांतही धुळीचे थर जमा जाऊ लागल्याने व्यापारी त्रस्त आहेत. विशेषतः रस्त्यांकडेने असलेल्या हॉटेल्समध्येही नागरिक पाठ फिरवत असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे.
शहरातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्ते खड्डेमय असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. नागरिक या धुळीपासून बचावासाठी तोंडाला मास्क, स्कार्फ, गॉगल व टोपी वापरत आहेत. तरीसुद्धा अनेकांना डोळ्यांचे, श्वसनाचे व त्वचेचे त्रास जाणवू लागले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना या धुळीचा सर्वाधिक फटका बसत आहे. धुळीच्या त्रासामुळे शहरात स्वच्छतेची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
धूळशमन यंत्रणेची मागणी
महापालिकेकडे असलेली धूळशमन (डस्ट कंट्रोल) यंत्रणा आता बाहेर काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या यंत्रणेमुळे रस्त्यांवरील धुळीच्या प्रमाणात बऱ्यापैकी घट होते. मशीनद्वारे रस्ते, वृक्ष आणि उभ्या वाहनांवरील धूळ पाण्याच्या सूक्ष्म फवारणीने नियंत्रणात आणली जाते. या वाहनांमुळे कल्याण-डोंबिवली शहरांत स्वच्छतेबरोबरच रस्त्यांच्या हवेतील प्रदूषणाचे प्रमाण घटविण्याचा उद्देश साध्य होतो. त्यामुळे या आधुनिक यंत्रणेद्वारे रस्त्यांची धूळ नियंत्रणात आणावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रस्त्यावरून जाताना चारचाकीच्या काचेवर धुळीचा थर जमा होतो. दुचाकीहून गेल्यास घातलेले कपडेही खराब होतात. रस्ते दुरुस्त होत नाही तोवर खड्ड्यातील धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागेल.
- चंद्रसेन सोनवळे, समाजसेवक, कल्याण
ऐन दिवाळीत दुकानाच्या फ्रंटला लावलेले सॅम्पल कपडे धुळीमुळे खराब होतात. खराब झाल्याने ते कुणीही घेत नसल्याने नुकसान होते. शिवाय काच, काउंटरवर जमणारी धूळ पुसण्यासाठी आम्हाला एक वेगळा माणूस नेमावा लागतो. हीच धूळ हॉटेलमध्ये शिरत असल्याने तिथेही ग्राहक कमी होत आहेत.
- भूषण अवसरे, व्यावसायिक, कल्याण
सततच्या धुळीमुळे फुप्फुसांचे आजार बळावतात. ज्यांना अगोदरच दमा आहे त्यांच्या आजारात वाढ होते. लहान मुलांना सर्वाधिक धुळीचा त्रास जाणवतो. श्वसनासह डोळ्यांचेही विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क आणि चष्मे अवश्य वापरावेत.
- डॉ. प्रमोद बैरागी, तज्ज्ञ डॉक्टर, कल्याण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.