ठाण्यात विरोधकांची वज्रमुठ

ठाण्यात विरोधकांची वज्रमुठ

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ ः वाढती वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, कचऱ्याची समस्या आणि बोकाळलेला भ्रष्टाचार आदी मुद्दे घेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे उद्या (ता. १३) रस्त्यावर उतरणार आहे. गडकरी रंगायतन ते ठाणे पालिका मुख्यालयापर्यंत ठाकरे बंधूंची सेना मोर्चा काढणार आहे. या मोर्चाची तयारी झाली असून त्याला अतिविराट स्वरूप देत एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. पालिका निवडणुकीआधी विरोधकांनी आपली वज्रमूठ घट्ट करण्यास सुरुवात केल्यामुळे हा मोर्चा त्याची दिशा देणारा ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार का, या चर्चेला ठाण्यातून उत्तर देण्यात येणार आहे. युतीची अधिकृत घोषणा होण्याआधीच ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे मनोमिलन झाले असून ठाणेकरांच्या समस्यांचा मुद्दा हाती घेत येथील स्थानिक नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानीही हे मनोमिलन पाहायला मिळाले होते. तेव्हाच पालिका प्रशासन आणि पडद्याआडून कारभार चालवणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला घेरण्याची रणनीती आखली होती. त्यानंतर मतदार याद्यांवरून ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत घोळ करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांच्या घरात घुसण्याचा इशारा दिला होता. त्याच वेळी ठाण्यातील या मोर्चाची माहिती देण्यात आली होती.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा मोर्चा सोमवारी (ता. १३) दुपारी तीन वाजता गडकरी रंगायतन येथून निघणार आहे. ठाणे महापालिकेवर प्रशासक आहे; मात्र राज्य सरकार पालिका चालवत असतानाही रस्ते, उद्यान घोटाळे होत आहेत. बनावट निविदा आणि देयके काढून पालिकेची तिजोरी लुटली जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. दुसरीकडे पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. कचऱ्याची समस्या वाढली आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि कोंडी याचा सामना रोजच ठाणेकरांना करावा लागत आहे. या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचाही पाठिंबा
ठाकरे बंधूंच्या सेनेने पुकारलेल्या या मोर्चाला आता राष्ट्रवादी शरद पवार गटानेही पाठिंबा दर्शवला आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते, समर्थक मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com