दिवाळीच्या स्वागताला बाजारपेठ सजली
दिवाळीच्या स्वागताला बाजारपेठ सजली
जिल्ह्यात परराज्यातील पणत्यांची चलती
कासा, त. १२ (बातमीदार) ः दिव्यांचा सण दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठा उजळल्या आहेत. घराघरात रोषणाईसाठी लागणाऱ्या मातीच्या, मेणाच्या आणि इलेक्ट्रॉनिक पणत्यांची खरेदी सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात आधुनिक सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली असली तरी पारंपरिक मातीच्या पणत्यांशिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटत नाही.
पालघर जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये सध्या परराज्यातील पणत्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. स्थानिक स्तरावरही काही प्रमाणात उत्पादन होत असले, तरी राज्यातील माती पणत्या तयार करण्यास फारशी योग्य नसल्याने त्यांना तडा जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्थानिक कुंभारांना गुजरात, बिहार आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यांतील मातीवर अवलंबून राहावे लागत आहे. उत्पादन खर्च, मजुरी आणि मेहनत अधिक तर मिळकत कमी असल्याने अनेक स्थानिक कारागीर आता थेट तयार माल घाऊक बाजारातून घेऊन किरकोळ विक्री करण्यावर भर देताना दिसत आहेत. त्यामुळे परराज्यातील पणत्या जिल्ह्यातील बाजारपेठांवर वर्चस्व गाजवत आहेत.दिवाळी जवळ आल्याने बाजारपेठांमध्ये रंगत आली असून, आकर्षक सजावट आणि प्रकाशमय दुकाने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे या वर्षीचा दिवाळी बाजार उत्साहात उजळला आहे.
नक्षीच्या पणत्यांना प्रतिसाद
बाजारात २० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारच्या पणत्या उपलब्ध असून, त्यामध्ये साध्या, नक्षीकाम असलेल्या, रंगीत, नारळातील, पानातील, पंचमुखी आणि मोठ्या आकाराच्या पणत्यांचा समावेश आहे. ग्राहकांकडून विशेषतः लाल रंगाच्या व आकर्षक नक्षीच्या पणत्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रस्त्यालगत दिवाळी साहित्य विक्री
गेल्या काही दिवसांत डहाणू तालुक्यात गुजरातमधील सुमारे आठ ते दहा विक्रेते दाखल झाले असून त्यांनी बाजारपेठांमध्ये रस्त्यालगत दुकाने उघडली आहेत. विक्रेते रोशन सहा यांनी सांगितले की, “आम्ही गेल्या आठ दिवसांपासून डहाणू येथे पणत्या आणि दिवाळी साहित्य विक्री करत आहोत. स्थानिक ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून विक्री समाधानकारक आहे.” पणत्यांसोबतच रांगोळी काढण्यासाठी लागणारे साचे, विविध रंग, आकाशकंदील, सजावटीच्या माळा आणि घरगुती प्रकाशयोजना यांचीही जोरदार विक्री सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.