‘लाडका भाऊ’ वाऱ्यावर
‘लाडका भाऊ’ वाऱ्यावर
प्रशिक्षित बेरोजगारांची ठाण्यात धडक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ ः मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाखो युवावर्गाला हक्काच्या कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला; मात्र ११ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर बेरोजगार युवाशक्तीला महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले. याविरोधात राज्यभरात आजवर १३ आंदोलने केल्यानंतरही सरकारला जाग येत नसल्याने ३६ जिल्ह्यांतील हजारो प्रशिक्षणार्थींनी रविवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केली. या वेळी बेरोजगार तरुणांनी एल्गार करीत येत्या आठवड्याभरात ठोस निर्णय घेतला नाही तर सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा देत यापेक्षा पाच पट संख्येने पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
२०२४च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेपाठोपाठ युवावर्गासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी (लाडका भाऊ) योजना राबवली. या अंतर्गत १० लाख बेरोजगार तरुणांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रतिमाह सहा हजार व १० हजार मानधन देण्यासोबतच सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले; मात्र १३ आंदोलने करूनही विविध सरकारी आस्थापनामध्ये काम केलेले तब्बल एक लाख ७५ हजार प्रक्षिणार्थी आजघडीला प्रशिक्षित तरुण बेरोजगार म्हणून फिरत आहेत. सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडल्याने या प्रशिक्षणार्थींनी रविवारी आंदोलन केले. तसेच, सरकारने फसवल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी साहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील-चाकुरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी केली. प्रशिक्षणार्थी बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार द्या, मानधनात दुप्पट वाढ करा, तसेच येत्या अधिवेशनात रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा करा, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. या आंदोलनात सांगलीचे तुकाराम बाबा महाराज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचे प्रकाश साबळे, ठाणे जिल्हाध्यक्ष निखिल म्हात्रे, मुंबई जिल्हाध्यक्ष काजल बुट्टे, लातूर जिल्हाध्यक्ष अनिकेत मांदळे, जालना जिल्हाध्यक्ष सुखदेव भिसे, विकी पाखरे, अकोला जिल्हाध्यक्ष पवन भट, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष नीलेश वसावे, रायगडचे ऋषी पवार, सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण माने आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील-चाकूरकर यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून येत्या आठ दिवसांत यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे चाकुरकर-पाटील यांनी सांगितले. जर या आंदोलनानंतरही सरकारने आश्वासन पाळले नाही. तर, आमची दिवाळी काळी करणाऱ्या सरकारलाही येणारी दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेने सरकारला दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.