बदलापूर पालिकेतील युतीत बदल
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. १३ : पाच वर्षांपासून प्रलंबित राहिलेली कुळगाव बदलापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय युतींची गणिते रचली जात आहेत. बदलापुरात महायुतीत फूट पडल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती कालच जाहीर करण्यात आली. या घोषणेनंतर बदलापुरातील शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या वाढत्या ताकदीमुळे भाजपसोबत युती करून पालिकेच्या सत्तास्थानावर पोहचण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या युतीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी युती हा नवीन पॅटर्न समोर आला आहे.
आगामी बदलापूर पालिका निवडणुकीसाठी बदलापूर शहरात जोरदार तयारी सुरू असून, सत्तेवर विराजमान असणाऱ्या सेना, भाजपला यंदाची निवडणूक ही वेगळीच आव्हाने घेऊन आलेली आहे. भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिंदे सेनेचे शहरप्रमुख म्हात्रे यांच्यात सुरू असलेले वाद ही या दोन्ही पक्षांत युती न होण्याचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्धार करण्यात आला होता. स्वतंत्र निवडणूक लढण्यावर शिंदे सेना ठाम असली तरी, सत्ता काबीज करण्यासाठी युतीची गणिते मांडण्याची आवश्यकता असल्याचे ओळखून, स्थानिक स्तरावर भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित येऊन युतीची घोषणा केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित आल्यामुळे यंदाची निवडणूक शिंदे गटाला जड जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार किसन कथोरे त्यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आशीष दामले यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगली कामगिरी बजावली. त्या वेळेस पालिका निवडणुकीच्या बाबतीत वाटाघाटी ठरल्या होत्या. त्यामुळे ठरल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये युती झाल्याचे कॅबिनेट मंत्री आशीष दामले यांनी स्पष्ट केले आहे.
११ जागांवर राष्ट्रवादीचा दावा
बदलापुरात राष्ट्रवादी आणि भाजप युती घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादीने ११ जागांवर दावा केला आहे. या संदर्भात आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या जागांसाठी वाटाघाटी झाल्यानंतरच युतीबाबत अधिक स्पष्टपणे सांगणार असल्याचे दामले यांनी सांगितले.
२०१५ च्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल!
२०१५ मध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेची निवडणूक पार पडली होती. त्या वेळी ४७ जागांसाठी मतदान झाले. त्यामध्ये शिवसेना २४ जागा, भाजप २० जागा, राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा, अपक्ष एक जागा, अशी पक्षीय बळाबळ अशी होती. यानंतर २०२० मध्ये कोरोनामुळे निवडणूक रखडली आणि आतापर्यंत पाच वर्षे ही निवडणूक प्रलंबित राहिली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक स्तरावर सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरात छुप्या बैठकी आणि रणनीतींचा वाढता गदारोळ ही तयारी दर्शवत असल्याचे स्थानिक सूत्रांकडून समोर येत आहे.
कॅबिनेट मंत्रिपदामुळे राष्ट्रवादीला मिळणार फायदा
निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांना देण्यात आले. अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले दामले यांनी ठाणे जिल्ह्यात, विशेषतः बदलापूर शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी केलेल्या कामांचा विचार करून हे पद त्यांना मिळाले. काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या अध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. यामुळे कॅप्टन आशीष दामले यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून, याचा थेट फायदा कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत होणार आहे.
एकनाथ शिंदे निर्णय करणार : आमदार
राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती होणार की नाही, याबाबत चर्चा वाढली होती. मात्र, बदलापूर शहरात शिंदे सेनेचे शहर प्रमुख आणि आमदार यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे सेनेसोबत युती होणार की नाही, हे अजूनही अस्पष्ट आहे. राष्ट्रवादीसोबत युती झाल्यानंतर भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्तरावर सेनेसोबत युती करण्याबाबत मी स्थानिक नेत्यांशी बोलणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठरवतील, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ. म्हणूनच बदलापूर शहरात महायुती स्थापन होणार का, याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीचे आमदार किसन कथोरे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही युतीधर्म पाळून काम केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली होती. त्यानुसारच राष्ट्रवादीने दावा केलेल्या जागांबाबत सकारात्मकता येत असल्याने आम्ही युतीची घोषणा करून त्यानुसार पुढील कामकाज करत आहोत.
- कॅप्टन आशीष दामले, कॅबिनेट मंत्री
राष्ट्रवादीसोबत अधिकृत युतीची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादीने दावे केलेल्या जागांबाबत अजून वाटाघाटी सुरू आहेत; पण त्या सकारात्मक चर्चेने लवकर सुटतील. तसेच, सेनेसोबत महायुतीबाबत स्थानिक स्तरावर कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नाही. या युतीसंदर्भात वरिष्ठ स्तरावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही काम करू.
- किसन कथोरे, आमदार भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.