मुरूडच्या मानसी कामोद नामजोशींचा आंतरराष्ट्रीय सन्मान
मुरूडच्या मानसी कामोद नामजोशींचा आंतरराष्ट्रीय सन्मान
न्यूझीलंड दिवाळी महोत्सवात कथक नृत्याने जिंकली पंतप्रधानांची दाद
मुरूड, ता. १३ (बातमीदार) : भारतीय संस्कृतीचा वैभव जगभर पसरविणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये मुरूडच्या मानसी कामोद नामजोशी यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी महोत्सवात त्यांनी कथक नृत्य सादर करत भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन घडविले. या सादरीकरणाला न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लुक्सन यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मान्यता दिली व नामजोशी यांच्या कलाविष्काराचे मनःपूर्वक कौतुक केले. या यशामुळे भारतीय कला आणि विशेषतः रायगड जिल्ह्याच्या नावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळाला आहे.
ऑकलंडमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या कामोद रवींद्र नामजोशी यांच्या पत्नी मानसी नामजोशी या गेल्या तीन वर्षांपासून ‘नूपूर डान्स अकॅडमी’च्या माध्यमातून कथक नृत्य शिकवित आहेत. त्यांनी ६ ते ६० वयोगटातील नृत्यप्रेमींसाठी नियमित प्रशिक्षणवर्ग सुरू केले असून, ऑकलंडसोबतच अमेरिका व ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गांचाही उपक्रम राबविला आहे. पुण्याच्या प्रसिद्ध कथक नृत्यांगना सोनिया परचुरे या त्यांच्या गुरू आहेत. दिवाळी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय कलाविष्काराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ‘नूपूर डान्स अकॅडमी’ला मिळाली होती. मानसी नामजोशी यांच्या नेतृत्वाखालील टीमने पारंपरिक पोशाख, नृत्यरचना आणि भावनात्मक सादरीकरणातून मंचावर उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी पंतप्रधान लुक्सन यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करत भारतीय नृत्यकलेच्या समृद्ध परंपरेबद्दल कौतुक व्यक्त केले. संचालिका मानसी नामजोशी यांनी सांगितले की, पंतप्रधानांशी काही क्षण संवाद साधण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या लहानग्या कलाकारांनी इतक्या सुंदरतेने सादरीकरण केले की, ‘पीपल्स चॉइस अवॉर्ड’ असता तर तो निश्चितच आमच्या नावे गेला असता. याप्रसंगी त्यांचे पती कामोद नामजोशी व कन्या अनुषा यांचादेखील सक्रिय सहभाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.