ऑनलाइन खरेदीत फसवणुकीचे जाळे!

ऑनलाइन खरेदीत फसवणुकीचे जाळे!

Published on

ऑनलाइन खरेदीत फसवणुकीचे जाळे!
बनावट वेबसाइट्स, ऑफर्स, फेक लिंक्सचा सुळसुळाट
पोलिसांचा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचा उत्साह आता बाजारात दिसू लागला आहे. रविवारचा मुहूर्त साधत ठाणेकरांनी बाजारपेठेत गर्दी करीत खरेदीचा उत्सव साजरा केला. पुढचे काही दिवस हेच चित्र असणार आहे. दुसरीकडे घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन खरेदीचाही धडका सुरू आहे. प्रत्येक कंपनी ‘बंपर ऑफर्स’, ‘मेगा सेल’, ‘९९ टक्क्यांपर्यंत सूट’ अशा जाहिराती देत असून ग्राहकांचा त्याला प्रतिसादही मिळत आहे. पण या डिजिटल सोयीसोबतच फसवणुकीचं जाळंही वेगाने वाढत आहे. तुमच्या मनातली वस्तू हेरणारी सायबर टोळी सक्रिय झाली असून, बनावट वेबसाइट, लिंकच्या माध्यमातून लुटण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी नागरिकांना ‘सावध राहा, सजग राहा’ असा इशारा दिला आहे.

सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांतच ठाणे व मुंबई परिसरात फेक वेबसाइट्स, बनावट ई-मेल लिंक, क्यूआर कोड पेमेंट फसवणूक व नकली डिलिव्हरी एजंट्स अशा अनेक तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रारी नोंदवण्याची संख्या तुलनेत कमी असली तरी कैक पटीने फसवणूक होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषत: १,०००-५०० रुपयांच्या फसवणुकीसाठी कुणीही पोलिस ठाणे गाठत नाही. एखादी मोठी रक्कम खात्यातून गेली तरच तक्रार नोंदवली जात आहे. त्यामुळे सायाबर लुटारूंना रान मोकळे झाले आहे. ऑनलाइन खरेदीबाबत अनेक प्रकार घडत असल्याचे ठाणे सायबर पोलिसांचे म्हणणे असून, त्यांनी त्याचा उलगडा करीत सावधान कसे राहता येईल, याविषयी मार्गदर्शन केले आहे.

सायबर विभागाचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश वारके यांनी दिलेल्या माहितीनुसार काही बनावट वेबसाइट्स मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या नावाने तयार केल्या जातात आहेत. एखादी वस्तू आपण गुगलवर सर्च करीत असताना हॅकर्स ते हेरतात. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर सेकंदात त्याच्या जाहिराती सुरू होतात. यामध्ये नामांकित कंपन्यांचाही समावेश आहे. त्यांनी त्यांची विश्वासार्हता जपली असली तरी बनावट कंपन्या त्याचा फायदा घेत कमी दर्जाच्या वस्तू घरपोच पाठवत आहेत. असे शेकडो प्रकार सध्या घडत आहेत. दुसरीकडे ‘फ्लॅश सेल’च्या नावाखाली पेमेंट घेतल्यानंतर साइट गायब होण्याचे अनुभवही अनेकांना येत आहेत. काही ठिकाणी लोकांना ‘लकी ड्रॉ जिंकला’ म्हणून लिंक पाठवून कार्ड डिटेल्स घेतल्या जातात. डिलिव्हरी बॉय बनून ओटीपी विचारूनही फसवणूक केली जात आहे. या सर्व जाळ्यात ग्राहक, विशेषत: महिलवर्ग अलगद सापडत आहे, असे वारके यांनी सांगितले.

एका ‘एस’मुळे अनर्थ टाळा
‘दिवाळीच्या काळात लोक ऑनलाइन गिफ्ट्स, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोन्याचे दागिने यावर जास्त खर्च करतात. त्यामुळे स्कॅमर्स या काळात सक्रिय होतात. खरी ऑफर आहे की नाही हे तपासण्यासाठी वेबसाइटचा पत्ता नीट पाहा. एचटीटीपीएस’ आणि लॉक चिन्ह आहे का ते तपासा. कारण नुसत्या एस या अक्षरावरून अनर्थ टाळता येऊ शकतो. याविषयी अधिक माहिती देताना वरिष्ठ निरीक्षक वारके यांनी सांगितले, की आपली ऑर्डर देताना किंवा क्रेडिट कार्ड माहिती देताना वेबपेजवरील एचटीटीपीएसने सुरू होत आहे का ही खात्री करा. केवळ एचटीटीपीएस असेल तर ती वेबसाइट बनावट असू शकते. एक छोटासा एस तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकतो.

सावधगिरीची सप्तपदी
१ फेक लिंकवर क्लिक करू नका.
२. क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी पडताळणी करा.
३ अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर आर्थिक संबंधी माहिती देऊ नका.
४ ऑफर्स फारच आकर्षक वाटत असतील तर ती फसवणूक असू शकते.
५ अधिकृत अ‍ॅप किंवा वेबसाइटवरूनच खरेदी करा.
६ ऑनलाइन पेमेंटसाठी सुरक्षित गेटवे वापरा. शक्यतो रोख रकमेत व्यवहार करा आणि तो करताना वस्तू आधी तपासून बघा.
७ सर्वात महत्त्वाचे संशयास्पद व्यवहार लगेच सायबर पोलिसांकडे १९३० या क्रमांकावर कळवा.

खरेदी डोळसपणे करा
दिवाळीच्या उत्साहात ऑनलाइन खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. या सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचत आहे. दुसरीकडे अनेक स्टार्टअप कंपन्यांना आधार मिळत आहे. पण या सर्वांमध्ये आपण बळीचा बकरा ठरणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अनेक वेळा वस्तू परत पाठवल्यावर रिफंड मिळते. पण काही फेक कंपन्या रिफंड देत नसल्याने पैसे बुडतात. असे प्रकार सर्रास घडत असून, डोळसपणे खरेदीचा आनंद घेतल्यास दिवाळीचा आनंद द्विगुणित होऊ शकतो, असा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे. थांबवायचं नाही पण डोळसपणे करायचं आहे. खरी बचत म्हणजे फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण. कारण सणाचा आनंद तेव्हाच टिकतो जेव्हा व्यवहार सुरक्षित असतात.

अशी ही बनवाबनवी
ठाण्यातील नम्रता पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका समाजमाध्यामावर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर विश्वास ठेवून एक ड्रेस विकत घेतला होता. प्रथमदर्शनी या वेबसाइटवर सर्वच चांगले दिसत होते. ५००पेक्षा जास्त व्हिवर्स होते. खाली प्रतिसादाचा कॉलमही समाधानकारक होता. त्यामुळे त्यांनी एक हजार २०० रुपयांचा ड्रेस ऑर्डर केला. सावधगिरी म्हणून त्यांनी रोख रक्कम दिली. पण जेव्हा ऑर्डरचा ड्रेस त्यांनी पाहिला तर तो १०० रुपयांच्या लायकीचाही नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यानंतर त्या वेबसाइटवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी नम्रता पवार यांनाच ब्लॉक करून टाकले. त्यांनी यासदंर्भात सायबर पोलिसांच्या १९३० क्रमांकावर आली तक्रार नोंदवली असून, पोलिस त्याचा पुढील तपास करीत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com