वडखळ-अलिबाग मार्गावर धुळीचे लोट
वडखळ-अलिबाग मार्गावर धुळीचे लोट
पोयनाड परिसरात नागरिकांचा त्रास वाढला
पोयनाड, ता. १३ (बातमीदार) : पावसाळा संपल्यानंतर नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांपासून थोडा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र वडखळ–अलिबाग राज्य मार्गावर पोयनाड परिसरात आता धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आधीच खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या या रस्त्यांवर आता धुळीची थर चढल्याने वाहतूक, आरोग्य आणि व्यापार यावर परिणाम होत आहे.
वडखळ–अलिबाग हा राज्य मार्ग जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, दररोज हजारो वाहने या मार्गावरून धावत असतात. पावसाळ्यात झालेल्या खड्ड्यांची काही ठिकाणी तात्पुरती भर घालण्यात आली आहे, परंतु या भराव्यामधूनच उडणारी धूळ स्थानिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. विशेषतः पोयनाड नाक्यापासून अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या भागात अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. ही धूळ केवळ रस्त्यालगतच्या दुकानदारांवर आणि विक्रेत्यांवरच नव्हे, तर प्रवाशांवर आणि पादचाऱ्यांवरही उडत असल्याने असह्य झाले आहे. धुळीमुळे दुकानदारांचा माल खराब होत असून, ग्राहक कमी येत आहेत. सतत धूळ श्वासावाटे शरीरात गेल्याने श्वसनविकार, डोळ्यांचे आजार यासारख्या तक्रारी वाढत आहेत. रस्त्यावरील खड्डे भरले तरी प्रशासनाने पाण्याची फवारणी किंवा तात्पुरती उपाययोजना केली नाही. त्यामुळे संपूर्ण भाग धुळीने माखलेला असतो. दिवसातून अनेक वेळा दुकानातील वस्तू पुसाव्या लागतात, असे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सणासुदीचा काळ सुरू असून गणेशोत्सव, नवरात्र आणि आता दिवाळी येऊन ठेपली आहे. अशा वेळी रस्त्यांची ही दयनीय अवस्था पाहून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेविषयी स्थानिक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
............
उपाययोजना करण्याची मागणी
दरवर्षी पावसानंतर रस्ते खड्डेमय होतात आणि धूळ उडते. यावर कायमस्वरूपी उपाय केले जात नाहीत. आरोग्याशी किती काळ खेळ चालू ठेवणार, असा सवाल पोयनाड परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. धुळीच्या समस्येमुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालक असे सर्वच त्रस्त असून तातडीने रस्त्यांवर पाणी फवारणी, डांबरीकरण किंवा कमीत कमी साफसफाईचे काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.