किल्ले बनविण्यात ''बाल मावळे'' दंग!
किल्ले बनविण्यात ‘बाल मावळे’ दंग!
दिवाळीच्या सुट्टीत किल्ल्यांची आकर्षक सजावट; तयार किल्ल्यांपेक्षा स्वनिर्मितीला पसंती
वंशिका चाचे ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : गणपती आणि नवरात्रीनंतर आता बच्चेकंपनीला दिवाळीचे वेध लागले आहेत. फटाके आणि फराळासोबतच किल्ले बनवण्याच्या उत्साहात लहानगे मावळे दंग झाले आहेत. परीक्षा संपताच ठाण्यातील गल्लीबोळात लहान मुलांनी किल्ले बनवायला सुरुवात केली असून, स्वतः साहित्य गोळा करत ते लहान हातांनी आकर्षक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात व्यस्त आहेत. दिवाळीच्या सुट्टीत मातीचा किल्ला बनवण्यात लहान मावळे अक्षरशः रंगून जातात. सध्या ठाण्यात ठिकठिकाणी मुले विटा, माती, धान्याची पोती अशा साहित्याचा वापर करून किल्ले तयार करत आहेत. बाजारात आकर्षक तयार मूर्ती आणि इतर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असले तरी, लहानग्यांनी मात्र स्वतःच्या हाताने किल्ला तयार करण्याला पसंती दिली आहे. तोरणा गड, प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, नवदुर्ग यांसारख्या शिवरायांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची क्रेझ त्यांच्यामध्ये दिसून येते.
चंदनवाडी ओम साई मित्र मंडळाच्या बाल मावळ्यांनी यंदाच्या वर्षी कोरी गडाची प्रतिकृती साकारणार असल्याचे सांगितले. सर्व एकत्र मिळून किल्ला बनवत असल्यामुळे खूप मजा येत असल्याचे या चिमुकल्यांनी सांगितले. या बाल कलाकृतींमुळे ठाणे शहरातील गल्ल्या सध्या किल्ल्यांनी सजलेल्या दिसत आहेत.
अभियंत्याप्रमाणे काम
छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम, आदर आणि भक्तीपोटी ठाण्यातील हे छोटे मावळे शूरवीर बनण्याची तयारी लहानपणापासूनच करत असतात. कोणतेही प्रशिक्षण नसताना एखाद्या अभियंत्याप्रमाणे ही मुले कच्च्या मालापासून किल्ला तयार करण्याचे काम करतात.
सगळ्यात देखणा किल्ला आपलाच असावा, यासाठी ही बच्चेकंपनी ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता सकाळी उठल्यापासून मेहनत घेत आहेत. किल्ला तयार झाल्यावर त्यावर महाराजांची मूर्ती, मावळे, मंदिर, कमान, घोडा, वाघ याची आकर्षक मांडणी करून हे सवंगडी दिवाळीची सुट्टी उत्साहाने साजरी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.