रानशेत–वाणगाव रस्त्याची दुरवस्था
रानशेत-वाणगाव रस्त्याची दुरवस्था
खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल; नागरिकांची त्वरित दुरुस्तीची मागणी
कासा, ता. १३ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, रानशेत ते वाणगाव या मार्गावरील रस्त्याची स्थिती तर अधिकच बिकट झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठ कसरत करावी लागते. यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
चारोटी-रानशेतमार्गे वाणगावला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, रेल्वे कॉरिडॉर आणि मुंबई-वडोदरा महामार्गासाठी अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक याच मार्गावरून सुरू असते. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने डांबर सैल पडून रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. रानशेत ते वधना हरडपाडा दरम्यानच्या एका मोरीजवळ तर दीड ते दोन फुटांचे खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाच्या पाण्याने हे खड्डे डबक्यांचे रूप धारण करत असल्याने वाहनांचा ताबे सुटून लहान-मोठे अपघात घडतात. रस्त्याच्या या दुर्दशेमुळे प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, कामगार आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. नागरिकांनी शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधून घेत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
अवजड वाहनांमुळे दुर्दशा
स्थानिक सामाजिक कार्यकर्ता सतीश कोठारी म्हणाले, गेल्या वर्षभरापासून या मार्गावर खड्डे पडलेले आहेत. दररोज अपघात घडत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी.
दुरुस्ती कामांना लवकरच सुरुवात
रानशेत ते वाणगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. लवकरच अनेक ठिकाणचे खराब झालेले रस्ते दुरुस्ती कामांना सुरुवात होणार आहे, असे बांधकाम विभागतील उपकार्यकारी अभियंता नितीन पगारे यांनी सांगितले आहे.