गृहिणींचा रेडिमेड रांगोळ्यांकडे वाढता कल
गृहिणींचा रेडिमेड रांगोळ्यांकडे वाढता कल
इन्स्टंट जमान्यात रांगोळी कलेलाही नवे रूप; बाजारात रंग, डिझाइन आणि साहित्याची नवी रेलचेल
नवीन पनवेल, ता. १३ (बातमीदार) : दिवाळीचा सण म्हटला की घराघरात उत्साह, आनंद आणि रंगांची उधळण दिसते. या सणाचे सौंदर्य अधिक खुलवणारी रांगोळी ही भारतीय संस्कृतीतील शुभ प्रतीक मानली जाते. पारंपरिक ठिपक्यांची, संस्कारभारती किंवा मुक्तहस्त रांगोळी काढण्याची प्रथा होती. सध्याच्या धावपळीच्या युगात गृहिणींचा कल आता रेडिमेड रांगोळी आणि इन्स्टंट डिझाइन्सकडे झुकताना दिसून येत आहे.
बाजारात या रेडिमेड रांगोळ्यांचे प्रचंड वैविध्य उपलब्ध असून, प्लॅस्टिक, ॲक्रिलिक आणि मेटॅलिक पत्र्यांवर सिल्व्हर कंटिग करून सुंदर डिझाइन रंगविल्या जातात. या रांगोळ्या १५० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. काहींवर मोती, काचा, वेल्वेट पेपर आणि कुंदन वर्क असल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात. लाकडी फळीवरील डिझाइनही लोकप्रिय होत आहेत. त्यांची किंमत २५० ते ८०० रुपयांपर्यंत आहे. रांगोळी रंगांचीही नवी क्रांती यंदा बाजारात दिसून येत आहे. दरवर्षी १८ रंग बाजारात असतात; पण यंदा विक्रेत्यांनी तब्बल २१ नवीन रंग सादर केले आहेत. रंगांच्या गडद आणि सौम्य छटा यांमुळे रांगोळी अधिक उठावदार दिसते, असे विक्रेते सांगतात. पारंपरिक पांढरी रांगोळी, रंगीत मिश्र रांगोळी आणि खास ग्लिटर रांगोळी असे तीन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रांगोळीच्या किमतीत थोडी वाढ झाली असली तरी विक्रेत्यांनी किंमत तीच ठेवून वजनात घट केली आहे. छोटा ग्लास १० रुपयांना आणि मोठा ग्लास २० रुपयांना विकला जात आहे. रंगीत रांगोळीचे तीन चमचे १० रुपयांना मिळतात.
...................
बाजारात नवीन पर्याय
यंदा प्लॅस्टिकच्या ग्लासमधून रांगोळी देण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. यामुळे रांगोळी रंगताना अधिक सोय होते. ज्यांचे बजेट कमी आहे त्या ग्राहकांसाठी रांगोळीचे तयार स्टिकर्सही पर्याय म्हणून आले आहेत. हे स्टिकर्स १० ते २०० रुपयांपर्यंत उपलब्ध असून, फक्त पील करून चिकटवायचे असल्याने सोपे आणि वेळ बचत करणारे आहेत. पूर्वी चाळणीच्या सहाय्याने झटपट रांगोळी तयार करण्याचा ट्रेंड होता. आता मात्र त्या चाळणींची जागा आकर्षक तयार डिझाइन्सनी घेतली आहे. त्यामुळे महिलांमध्ये वेळ वाचवणाऱ्या तरीही सुंदर दिसणाऱ्या रांगोळींची मागणी वाढली आहे. रांगोळी विक्रेते महेश गोंधळे सांगतात, की विविध प्रकारच्या कलरमध्ये आणि डिझाइनमध्ये रांगोळ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. महिला ग्राहकांकडून खरेदीला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.