पाच दिवसांपासून नळ कोरडे

पाच दिवसांपासून नळ कोरडे

Published on

पाच दिवसांपासून नळ कोरडे
उल्हासनगरमध्ये संतप्त महिलांचा हंडा मोर्चा
उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर): उल्हासनगर शहर पुन्हा एकदा तीव्र पाणीटंचाईच्या विळख्यात सापडले असून, कॅम्प क्रमांक ४ मधील श्रीरामनगर परिसरातील नळ सलग पाच दिवसांपासून कोरडे पडले आहेत. पाणीपुरवठा विभागाने केवळ २४ तासांचा शटडाऊन सांगितला होता, मात्र पाच दिवस उलटूनही पाणी आले नसल्याने नागरिकांचा संयम तुटला. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त महिलांनी डोक्यावर रिकामे हांडे घेऊन हंडा मोर्चा काढला, तर एका भाजप पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील श्रीरामनगर परिसरात ९ ऑक्टोबरपासून नळ कोरडे आहेत. पाणीपुरवठा विभागाने शुक्रवारी (ता. १०) २४ तासांसाठी शटडाऊन घेतल्याचे सांगितले होते, मात्र ते शटडाऊन संपून पाच दिवस उलटून गेले तरी पाणीपुरवठा सुरूच झालेला नाही. अखेर पाच दिवसांच्या पाण्याविना जगण्यातून नागरिकांचा संयम तुटला आणि संतप्त महिलांनी पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा काढत संताप व्यक्त केला. सोमवारी (ता.१३) सकाळी प्रभात गार्डन परिसरात पाणीपुरवठा विभागासमोर डोक्यावर हांडे घेऊन महिलांचा प्रचंड जमाव जमला. ‘‘आम्हाला पाणी हवं, आश्वासन नको!’’ ‘‘२४ तास म्हणाले, पण १२० तास झाले!’’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. महिलांनी अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले, ‘‘शहरात सर्वत्र पाणी येते, मग श्रीरामनगर तहानलेले का?’’ पण अधिकाऱ्यांनी दिलेल्या ‘उडवा-उडवीच्या’ उत्तरांनी वातावरण अधिकच तापले.

नागरिकांच्या रोषाला पाहून भाजप पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना थांबवलं, अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आणि नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनात भाजप पदाधिकारी योगेश म्हात्रे, भाविका म्हात्रे, बापू सावंत, प्रकाश माळी, निखिल पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांच्या घोषणांनी आणि संतापाने प्रभात गार्डन परिसर दणाणून गेला.

आता रास्ता रोको आंदोलन
नागरिकांनी सांगितले की हा गेल्या काही महिन्यांतील तिसरा पाण्याचा मोर्चा आहे. प्रत्येकवेळी अधिकारी आश्वासने देतात, पण पाणी येत नाही. “या वेळीही प्रशासन झोपेत राहिले, तर श्रीरामनगर चौकात रास्ता रोको आंदोलन करून शहर ठप्प करू,” असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.

शहरात पाण्याची टंचाई आहे, हे प्रशासनाला ठाऊक असूनही कोणी जबाबदारी घेत नाही. पाच दिवस झाले, तरी पाणी नाही. अधिकारी जागे झाले नाहीत, तर आम्ही तीव्र आंदोलन उभारू.
योगेश म्हात्रे, स्थानिक

महिलांना रोज सकाळपासून रात्र होईपर्यंत पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. एवढ्या मोठ्या शहरात आम्हाला अजूनही बादलीत पाणी साठवावं लागतं, हे लाजिरवाणे आहे.
भाविका म्हात्रे, स्थानिक

२४ तासांचं शटडाऊन सांगून लोकांची दिशाभूल केली. प्रत्यक्षात पाच दिवस झाले तरी नळ कोरडेच आहेत. आता आमचं संयम संपलं आहे.
प्रा. प्रकाश माळी, स्थानिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com