रायगडमध्ये वीज प्रतिरोधक यंत्रणा रखडली
वीज प्रतिरोधक यंत्रणा रखडली
चार वर्षांपासून प्रस्ताव सरकार दरबारी धूळखात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : पावसाळ्यात वीज कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. वीज कोसळून १४ पाळीव जनावरे दगावल्याच्या घटना या वर्षी घडल्या आहेत. तर मालमत्तांचे नुकसान झाल्याच्या लहान-मोठ्या घटना घडल्याची नोंद झालेली आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ९३४ ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यात येणार होती. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत तब्बल आठ कोटी ३० लाख रुपये खर्चाची ही योजना होती. जिल्हा प्रशासनाने चार वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे; मात्र हा प्रस्ताव अद्यापही धुळखात पडून आहे.
पावसाळ्यात जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वीज पडण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसून येतात. त्यामध्ये दरवर्षी सरासरी दोन नागरिकांचा बळी जात आहे तसेच गुरेढोरे मृत होण्याचे प्रमाणही मोठे आहे. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचेही लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होते. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील १३ विभागांतील ९३४ ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्याचे नियोजन केले होते. याबाबतचा प्रस्तावही राज्य सरकारकडून केंद्र सरकाराला पाठवण्यात आला असल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागचे तत्कालीन संचालक अभय यावलकर यांनी सांगितले होते. मात्र अद्याप सरकारी पातळीवरून कोणताच सकारात्मक प्रतिसाद आला नसल्याचे जिल्हा आपत्ती निवारण विभागाने स्पष्ट केले.
दीपस्तंभाच्या डागडुजीची मागणी
ब्रिटिशांच्या कालावधीत अलिबाग तालुक्यातील रेवस आणि मांडवा या ठिकाणी सुमारे १०० फूट उंचीचे दीपस्तंभ उभारले होते. पूर्वी समुद्रमार्गे धरमतरची खाडी ते अगदी श्रीवर्धन ते गोवा, कर्नाटकपर्यंत व्यापार चालायचा. त्यांना हे दीपस्तंश दिशादर्शक ठरायचे. त्याचप्रमाणे मुघल कालखंडात रात्रीच्या वेळी भरसमुद्रातून एखादे जहाज कोकण प्रांतात येत असेल, तर टेहळणी बुरूज म्हणूनदेखील या दीपस्तंभाचा उपयोग केला जात होता. या दोन्ही दीपस्तंभांवर वीजरोधक प्रणाली बसवण्यात आली होती. त्यामुळे अलिबाग तालुक्यामध्ये वीज पडत नव्हती. येथील तांब्याच्या साहित्याची सुमारे ५० वर्षांपूर्वी चोरी झाली आहे. सरकारने या दीपस्तंभाची डागडुजी करून वीज प्रतिरोधक यंत्रणा नव्याने कार्यान्वित करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार होत आहे.
जिल्ह्यातील वीज प्रतिरोधक यंत्रणा
जिल्हाधिकारी कार्यालय-१, जिल्हा परिषद मुख्यालय-१, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय-१, जिल्हा सामान्य रुग्णालय-१, उपविभागीय अधिकारी कार्यालय (सर्व)-८, तहसीलदार कार्यालय (सर्व)-१५, गटविकास अधिकारी कार्यालये (सर्व)-१५, नगरपालिका/नगरपंचायत कार्यालये (सर्व)-१५, जिल्हा रुग्णालये/ग्रामीण रुग्णालये (सर्व)-१६, प्राथमिक आरोग्य केंद्र (सर्व)-५२, पोलिस ठाणे (सर्व)-३६, बसस्थानके-१५, ग्रामपंचायत कार्यालये (सर्व)-८०४ असे वीज प्रतिरोधक बसविण्यात येणार आहेत.
सर्वसाधारणपणे उंच इमारती, मोबाईल टॉवर, कंपन्यांच्या चिमण्या, वेधशाळा, उच्च दाबाचे वीजवाहिनी टॉवर या ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. या ठिकाणच्या परिसरामध्ये वीज कोसळली तर वीज प्रतिरोधक यंत्रणा आपल्याकडे वीज खेचून घेते. त्यानंतर सक्षम प्रणालीच्या माध्यमातून ती जमिनीखाली वळवली जाते. त्यामुळे वीज पडण्याच्या घटना कमी होऊन मनुष्य आणि वित्तहानी टाळता येते. ही वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यासाठी जिल्ह्यातील ९३४ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती; मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.
- सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.