एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

Published on

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

सहा हजार रुपयांचा बोनस जाहीर; आंदोलन मागे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासोबतच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम (उचल) म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता. १३) जाहीर केला. त्यामुळे १४ ऑक्टोबरपासून एसटी कामगार कृती समितीने पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथिगृह येथे सोमवारी झाली. या बैठकीला परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध एसटी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड झाली पाहिजे, म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एसटीचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्त्वावर एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार आहे.’


५४ कोटी रुपयांची मागणी : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये बोनस देण्यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच २०२०-२४ दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून, यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनादेखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com