ठाण्यात मोर्चामुळे वाहतूक कोंडी

ठाण्यात मोर्चामुळे वाहतूक कोंडी

Published on

ठाण्यात मोर्चामुळे वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाहतूक कोंडी, भ्रष्टाचार, पाणीटंचाई, महागाई आदी स्थानिक प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी सोमवारी संयुक्त मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे ठाणेकरांना अक्षरशः वेठीस धरले गेले. ऐन सायंकाळी ठाण्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक आणि गडकरी रंगायतन येथे नाटक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना या कोंडीतून मार्ग काढणे अवघड झाले.
राम गणेश गडकरी रंगायतन येथून दुपारी ३ वाजता मोर्चा सुरू होणार होता; मात्र प्रत्यक्षात तो सायंकाळी सव्वापाच वाजता निघाला. गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असली तरी संपूर्ण मध्यवर्ती ठाण्यातील वाहतूक ठप्प झाली. महापालिका मुख्यालयाजवळ स्टेज उभारल्याने एक मार्ग बंद करण्यात आला होता. परिणामी या परिसरातील वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. तसेच या मोर्चाच्या माध्यमातून उद्धव सेना, मनसे आणि शरद पवार गटाने ठाण्यात आपले राजकीय शक्ती प्रदर्शन केले. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन महत्त्वाचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, शिंदे गट आणि भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जुने ठाणे भागात हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, याच वेळी गडकरी रंगायतन येथे कुटुंब किर्रतन या नाटकाचा प्रयोग सुरू होता. एकीकडे मोर्चासाठी कार्यकर्त्यांची गर्दी जमली असताना दुसरीकडे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांनी रांग लावली होती. मोर्चेकऱ्यांच्या गर्दीतून वाट काढत प्रेक्षकांना आत प्रवेश करावा लागला. महापालिका मुख्यालय परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित असून, येथे हॉस्पिटल्स आणि शासकीय कार्यालये आहेत. तरीही मोर्चादरम्यान झालेल्या भाषणांमुळे आणि घोषणांमुळे आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
...
प्रथमच उद्धव सेना-मनसे एकत्र
या मोर्चाच्या निमित्ताने उद्धव सेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष प्रथमच ठाण्यात एकत्र आले. मोर्चात दोन्ही पक्षांचे झेंडे फडकत होते. ‘ठाकरे बंधू आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com