बसमध्ये महागडा मोबाईल चोरीला
बसमध्ये महागडा मोबाईल चोरीला
तरुणाने कल्याण रोडवर बस थांबवून प्रवाशांची घेतली झडती
सकाळ वृत्तसेवा,
डोंबिवली, ता. १४: कल्याण रोडवर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण असताना, त्यातच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिम येथील बैल बाजार परिसरात एका तरुणाचा बसमध्ये दीड लाखांचा महागडा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली. पत्नीला माहेरी सोडण्यासाठी तो बसमध्ये चढला होता, तेव्हा ही चोरी झाली. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच, संतप्त तरुणाने रस्त्याच्या मधोमध बस थांबवली आणि प्रत्येक प्रवाशाच्या बॅगची व खिशांची तपासणी सुरू केली. बस प्रवाशांनी भरलेली होती. नाईलाजाने प्रवासी एक-एक करून आपली बॅग व खिसे तपासणीसाठी देत होते आणि खाली उतरत होते. या प्रकारामुळे वाहतूक कोंडी झाल्याने बाजारपेठ पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संतोष साळवे (चोरीला गेलेल्या मोबाईलचा मालक) याची चौकशी केली. पोलिसांनी त्याला समजावले की, "तू लोकांना त्रास देत आहेस. मोबाईल मिळाला का? तुझी काही तक्रार असेल तर पोलिस ठाण्यात कर, आम्ही शोध घेऊ. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला; मात्र संतोष साळवे याच्या या कृत्यामुळे प्रवासी, बस चालक, वाहक आणि वाहतूक पोलिसांचा नाहक खोळंबा झाला व त्यांना त्रास सहन करावा लागला.