कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

डोंबिवलीत सर्पदंश जनजागृती कार्यक्रम
डोंबिवली (बातमीदार): डोंबिवली परिसरात नुकताच एका चिमुकलीचा आणि तिच्या मावशीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, तसेच परिसरात अनेकदा सापांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ''रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट''ने सर्पदंश जनजागृती कार्यक्रम राबवला. अचानक उद्भवणाऱ्या अशा प्रसंगी नागरिकांनी शांत, सजग आणि तयार राहण्यास मदत व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांच्या संकल्पनेतून रो. विजय घोडेकर आणि स्थानिक सर्पमित्र ऋषी सुरसे यांच्या सहकार्याने आवश्यक माहिती असलेले रंगीत माहितीपत्रक तयार करण्यात आले. यामध्ये परिसरात आढळणारे अविषारी, अर्धविषारी आणि विषारी साप, त्यांचे फोटो व त्यांची वैशिष्ट्ये यांचा अंतर्भाव करण्यात आला, जेणेकरून मुलांना व सामान्य माणसांना साप पटकन ओळखता येईल. यासोबतच, डोंबिवलीतील सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक, सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथमोपचार आणि उपचारांसाठीचे आपत्कालीन क्रमांक असलेली माहिती रोटरी गार्डनच्या प्रवेशद्वारावर स्पष्टपणे लावली आहे. या माहितीपत्रकाची डिजिटल आवृत्तीही तयार करून ती समाजमाध्यमांद्वारे व्यापकपणे प्रसारित करण्यात येणार आहे. क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत आणि मानद सचिव विनायक आगटे यांनी हा लहान, पण अर्थपूर्ण उपक्रम समाजात जागृती निर्माण करून, घबराटीऐवजी योग्य माहिती आणि वेळेवर केलेल्या कृतीद्वारे जीव वाचविण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला.
..........................................
मूल्यांकन चाचणीतील मातृभाषा, गणित विषयाची परीक्षा
कल्याण (वार्ताहर): कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महापालिका शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित १ परीक्षेतील मातृभाषा (प्रथम भाषा) आणि गणित विषयाची परीक्षा अनुक्रमे शुक्रवार व शनिवारी घेण्यात आली. या परीक्षेसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने योग्य नियोजन करून प्रश्नपत्रिकांचे वाटप संबंधित शाळांना केले होते. यामध्ये प्रामुख्याने भाषा, गणित व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा अंतर्भाव होता. परीक्षेदरम्यान प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले होते. शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे व शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ५९ मनपा शाळा व २१९ खाजगी अनुदानित शाळांमध्ये परीक्षेचे उत्तम नियोजन करण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. पीएटी -२ चाचणी योग्य नियोजनात आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार भाषा विषयाची परीक्षा शुक्रवारी तर गणिताची परीक्षा शनिवारी यशस्वीरित्या झाली. या चाचणीतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन केले जाणार आहे.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com