रखडलेले पनवेल आयटीआयचे एकात्मिक संकुल लवकरच
रखडलेले पनवेल आयटीआयचे एकात्मिक संकुल लवकरच
पनवेलमध्ये दोन महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात
पनवेल, ता. १४ (बातमीदार) : पनवेलमध्ये रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक संकुलाच्या बांधकामाला अखेर गती मिळाली आहे. येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिलिंद कदम यांनी दिली.
२७ मार्च २०२३ रोजी तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते या संकुलाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात झाले होते, मात्र प्रशासकीय विलंब आणि विभागीय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात झालेल्या विलंबामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती. अखेर राज्य शासनाने सुधारित निर्णय काढत हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहे. या संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी सुमारे ४३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पाच प्रमुख इमारतींचा यात समावेश असून, एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे ५८, ५२७ चौरस मीटर एवढे असेल. यात प्रशासकीय इमारत (४, ६५१ चौ.मी.), आयटीआय इमारत (१६, ७६५ चौ.मी.), शैक्षणिक संकुल (२७, ६२३ चौ.मी.), ग्रंथालय-वाचनालय-सेमिनार हॉल (५, ६७० चौ.मी.) आणि युटिलिटी ब्लॉक (३, ७१८ चौ.मी.) यांचा समावेश आहे. या पहिल्या टप्प्याचे काम साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या एकात्मिक संकुलात कौशल्य विकास केंद्र, संशोधन प्रयोगशाळा, २० नवीन अभ्यासक्रम, अत्याधुनिक वर्ग, ग्रंथालय, क्रीडांगण, विद्यार्थी वसतिगृह आणि उद्योगांशी सामंजस्य करार यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकामासंबंधी अग्निशमन विभागाचे तसेच भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवले असून, पनवेल महापालिकेकडून बांधकाम परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सर्व परवानग्या पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांत कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिलिंद कदम यांनी दिली. या प्रकल्पामुळे पनवेल परिसरातील युवकांना कौशल्याधारित उच्च शिक्षणाची नवी दिशा मिळेल. तसेच रतन टाटा विद्यापीठ आणि आयटीआयचे हे एकात्मिक संकुल राज्यातील तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात आदर्श ठरणार असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.