रेबीज मुक्तीकडे पनवेल पालिकेची वाटचाल

रेबीज मुक्तीकडे पनवेल पालिकेची वाटचाल

Published on

रेबीजमुक्तीकडे पनवेल पालिकेची वाटचाल
१५ आरोग्य केंद्रांत रेबीज क्लिनिक सुरू; २०२८ पर्यंत लसीकरण मोहिमेला गती
पनवेल, ता. १४ (बातमीदार) ः शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका प्रशासनाने रेबीज नियंत्रणासाठी ठोस पावले उचलली आहेत. रेबीजमुक्त पनवेल या ध्येयाकडे वाटचाल करत महापालिकेने २६ पैकी १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये क्लिनिक सुरू केली आहेत.
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबवली जात आहे. या केंद्रांत कुत्रा चावल्यानंतर त्वरित उपचार, लसीकरण आणि जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जातात. पनवेल पालिका हद्दीत मागील नऊ महिन्यांत तब्बल पाच हजार ९९४ श्वानदंशाच्या घटना घडल्या असून, त्यापैकी बहुतांश घटना भटक्या श्वानांच्या चाव्याच्या आहेत. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने आतापर्यंत ७२ टक्के रेबीज लसीकरण पूर्ण केल्याचे सांगितले आहे. शहरात सध्या सुमारे १९ हजार ३०७ भटके श्वान असून, त्यापैकी १५ हजार ६७९ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत गेल्या काळात श्वानदंशानंतर एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती पालिकेने दिली आहे. हे यश वेळेवर उपचार, उपलब्ध लसीकरण आणि जनजागृती मोहिमेमुळे शक्य झाले आहे. भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून निर्बीजीकरण मोहिमेची गती वाढवली आहे. पालिकेकडे पाळीव आणि भटक्या श्वानांची नोंदणी केलेली माहिती उपलब्ध असून, त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण मोहिमा राबविल्या जात आहेत, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगितले.

सर्पदंश आणि विंचूदंशावरील लसी उपलब्ध
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंश आणि विंचूदंशावरील लसी उपलब्ध असून, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ३०० दंशाच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. रुग्णालयात सर्व प्रकारच्या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे अधीक्षक डॉ. अशोक गीते यांनी सांगितले.

‘रेबीज फ्री पनवेल’चे ध्येय
भारत सरकारचे उद्दिष्ट २०३० पर्यंत देशाला रेबीज फ्री बनविण्याचे असले तरी, पनवेल महानगरपालिकेने हे ध्येय २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. या उद्दिष्टासाठी लसीकरण, निर्बीजीकरण, जनजागृती आणि नागरिकांच्या सहकार्याने पनवेल महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com