दिवाळीच्यानिमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा
दिवाळीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा
उमेदवारांकडून विविध उपक्रमांद्वारे जनसंपर्क मोहिमा
वाशी, ता. १४ (बातमीदार) : दिवाळीचा सण जवळ येताच नवी मुंबईत राजकीय वातावरणही अधिक तापू लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, नव्या प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीच्या प्रतीक्षेत अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. सणाचा आनंद आणि राजकीय स्पर्धा या दोन्हींचा संगम शहरात दिसू लागला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने उमेदवारांकडून महिला मंडळे, युवक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, रहिवासी संघटना अशा सर्व घटकांशी संपर्क साधण्याचे नियोजन सुरू आहे. काही ठिकाणी दिवाळी फराळ समारंभ, आकाशकंदील व रांगोळी स्पर्धा, किल्ले स्पर्धा, वयोवृद्ध सन्मान सोहळे, तसेच ‘दिवाळी पहाट’सारखे सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून उमेदवार स्वतःची उपस्थिती दाखवत आहेत. अनेकांनी मिठाईच्या बॉक्सपासून सजावटीचे साहित्य आणि भेटवस्तू देऊन मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावरदेखील राजकीय शुभेच्छा संदेशांची रेलचेल वाढली आहे. काही ठिकाणी शुभेच्छांच्या नावाखाली प्रचार संदेश देण्यात येत असून, सणासुदीच्या शुभेच्छा बॅनर आणि पोस्टरचा अक्षरशः पूर शहरभर दिसू लागला आहे. सत्ताधारी पक्ष असो वा विरोधक, दोघेही मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. सणाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या जनसंपर्क मोहिमा आगामी निवडणुकीच्या तयारीचा एक भाग मानल्या जात आहेत. दिवाळीच्या प्रकाशात झगमगणारे शहर आता राजकीय रंगातही न्हाऊन निघाले आहे, मात्र या चमकदार मोहिमांमध्ये कोण खऱ्या अर्थाने सेवाभाव दाखवते, यावर मतदारांचे लक्ष केंद्रित आहे.