आदिवासी युवकांसाठी पहिले राष्ट्रीय संमेलन उत्साहात
आदिवासी युवकांसाठी पहिले राष्ट्रीय संमेलन उत्साहात
विक्रमगड, ता. १५ (बातमीदार) ः कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, औंदे येथे काश फाउंडेशन, मुंबई व संजीवन ग्रामीण वैद्यकीय व सामाजिक सहाय्यता प्रतिष्ठान, ओंदे संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या विद्यमाने आदिवासी युवकांसाठी पहिले राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन काश फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त डॉ. अवकाश जाधव आणि सं. ग्रा. वै. व सा. स. प्रतिष्ठानच्या संचालिका शीतल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चांदोजी गायकवाड यांनी सर्व प्रमुख मान्यवरांचे बुके व शाल देऊन स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालय व काश फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमात काश फाउंडेशनच्या सहसंचालक (शिक्षण) डॉ. गीता अजित यांनी फाउंडेशनची ध्येय व उद्दिष्टे यावर प्रकाश टाकला. काश फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त डॉ. अवकाश जाधव यांना ‘नवीन तंत्रज्ञान, कायदा आणि सामाजिक विज्ञान’ या विषयात मेडिटेरेनिया इंटरनॅशनल सेंटर फॉर ह्युमन राइट्स रिसर्च, सिट्टाडेला युनिव्हर्सिटीरिया, इटली यांनी नुकतीच पोस्ट-डॉक्टरल पदवी बहाल केली. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या संमेलनात संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी काश फाउंडेशनच्या माध्यमातून महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. संतोष धामोणे, संमेलन सचिव यांचादेखील काश फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमानंतर सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. दिनेश नहिरे व सदस्य प्रा. सुषमा गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या संमेलनाच्या उद्घाटनानंतर काश फाउंडेशनच्या सौजन्याने पाच विद्यार्थिनींना प्रायोगिक तत्त्वावर शैक्षणिक प्रवासाकरिता सायकल वाटप करण्यात आले.
पहिल्या सत्रात अॅड. सुरेश सावंत, वकील, मुंबई उच्च न्यायालय, सॉफ्टवेअर प्रोग्रामर यांनी ‘कायदा आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील करिअर’ यावर सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. हर्षवर्धन वर्मा, भौतिकशास्त्र विभाग, सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांनी ‘विज्ञान आणि संबंधित क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. युवराज नलावडे, सहाय्यक प्राध्यापक, भवनचे एच. सोमाणी कॉलेज, चौपाटी मुंबई यांनी ‘करिअर कंपास - तुमचा शोध,’ डॉ. रेहान अन्सारी (पीएचडी, एमआरआयसीएस), शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक यांनी ‘डीकोडिंग करिअर - शिक्षणानंतरच्या करिअरच्या संधी,’ सीएस डॉ. चेतन गांधी, पीसीएस आणि नेतृत्व आणि जीवन परिवर्तन तज्ज्ञ यांनी ‘करिअर जागरूकता’ तसेच अॅड. श्रीराज महेश जाधव, अय्यंगार योग शिक्षक यांनी ‘आरोग्य, कल्याण आणि आरोग्यसेवेतील संधी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या संमेलनाच्या निरोप समारंभात काश फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त डॉ. अवकाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. भीमराव बनसोडे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन या संमेलनाचे सचिव प्रा. संतोष धामोणे यांनी मानले तसेच डॉ. पी. डी मस्के यांनी तांत्रिक सहाय्य केले. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रेणुका व्यास, मयंक पोदार, महेंद्र पोदार, अल्पा मेहता, पामेला धोंडे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सुनीलदत्त गोडसे, डॉ. सय्यद जुनेद, गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख हे उपस्थित होते. संमलनाच्या यशासाठी प्रा. संतोष धामोणे, डॉ. रेणुका व्यास, अल्पा मेहता, पामेला धोंडे, डॉ. भीमराव बनसोडे, काश फाउंडेशन सर्व सदस्य, सांस्कृतिक विभाग, डीएलएलई विभाग, एनएसएस विभाग, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.